क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी डेव्हलपरवर गुन्हा दाखल

0

मुंबई – क्रिस्टल टॉवर इमारतीला बुधवारी भीषण आग लागली होती. या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इमारतीच्या डेव्हलपरवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अब्दुल रझाक इस्माईल पुरीवाला असे या डेव्हलपरचे नाव असून भोईवाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

इमारतीतील आग अग्निशमन यंत्रणा कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवणे व इलेक्ट्रिक डक्ट सील करणे अत्यावश्यक असते. याची जाणीव असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी काळजी न घेतल्याने इमारतीस लागलेल्या आगीत १ महिला व ३ पुरुष असा एकूण ४ जणांचा मृत्यू झाला होता. तर, आग विझवताना अग्निशमन दलाचे ५ कर्मचारी जखमी झाले होते.

दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवाशांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण केल्या प्रकरणी विभागीय अग्निशामक अधिकारी विनोद मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात विकासक अब्दुल रझाक इस्माईल यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या तक्रारीवरून अब्दुल रझाक इस्माईल पुरीवाला यास भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्याच्या वृत्ताला परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी दुजोरा दिला आहे.