क्रिस्टीयाने रोनाल्डो हाजीर हो….!

0

माद्रिद । दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टीयाने रोनाल्डा याला प्राप्तीकर चुकवल्याप्रकरणी सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. रोनाल्डो हा मैदानावर जितका प्रसिध्द आहे तितकाच त्याच्या वैयक्तीक जीवनातही अनेक वादाचे प्रसंग घडले आहेत. आता फुटबॉलचा मोसम सुरू होण्याआधी त्याला न्यायालयीन कटकटीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या कामकाजात नेमके काय होते ? याकडे रोनाल्डो याचे चाहतेच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील मातब्बरांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे तो स्वत: पोर्तुगालचा नागरिक असला तरी त्याच्यावर स्पेनच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
रियल माद्रिदचा सुपरस्टार खेळाडू रोनाल्डो याने 2011 ते 2014 या कालावधीत आपले उत्पन्न 11.5 दशलक्ष डॉलर्सचे दाखविले होते. पण प्रत्यक्षात त्याने या कालावधीत 43 दशलक्ष डॉलर्सची कमाई केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर प्राप्तीकर चुकविण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये बार्सिलोना संघातील अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लायोनेल मेसीनंतर रोनाल्डोचा क्रमांक आहे. गेल्यावर्षी मेसीवरही प्राप्तीकर बुडविल्याचा आरोप होता. यातच आता रोनाल्डोच्या मागेदेखील हे झेंगट लागले आहे. फोर्बस या मासिकाच्या निरीक्षणाअखेर 32 वर्षीय रोनाल्डो हा जगातील सर्वात महागडा आणि श्रीमंत खेळाडू म्हणून ओळखला जातो. रोनाल्डोचे वास्तव्य माद्रिदमध्ये असून त्याच्या नांवावर लाखो डॉलर्सची संपत्ती असल्याचे समजते. रोनाल्डोवर प्राप्तीकर चुकविल्याचे आरोप असून हे प्रकरण आता
न्यायप्रविष्ट आहे.

आधीदेखील सापडला वादात
क्रिस्टीयाने रोनाल्डो हा अतिशय दर्जेदार स्ट्रायकर खेळाडून असून भल्याभल्यांना चकवत गोल करण्यासाठी तो ख्यात आहे. मात्र तितकाच तो मैदानाबाहेरच्या कृत्यांनीही चर्चेत असतो. 2005 साली त्याच्यावर एका महिलेने शारिरीक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्याला यासाठी अटकदेखील करण्यात आली होती. यानंतर 2008 साली त्याला अतिमद्यपानाच्या आरोपाला तोंड द्यावे लागले होते. एका बॉक्सरसोबतच्या कथित समलैंगिक संबंधांमुळेही त्याला बदनामीला सामोरे जावे लागले आहे. तर अनेकदा तो आपले सहकारी, विरोधी संघ, खेळाडू, प्रशिक्षक, क्लब्ज आदींबाबत तिखट भाष्य करत असल्यानेही वादात सापडतो.