क्रीडा वास्तु, मैदाने भाड्याने देताना करदात्यांचा विचार करा

0

ठाणे । भारताचे भावी क्रिडापटूू ठाण्यातून निर्माण व्हावेत या गोंडस नावाखाली ठाणे महापालिका हद्दीतील करदात्या नागरिकांच्या पैशातून उभे राहिलेल्या क्रिडा वास्तू, जागा आज खाजगी करणाच्या माध्यमातून काही संस्थांना आंदण दिल्या जात आहेत. भरमसाठ फी घेऊन प्रशिक्षण देणार्‍या या संस्थांना वेळीच आवार घालावा व करदात्या सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना या सुविधा अल्पदरात उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.

पालिकेच्या शाळेतील फक्त 10 जणांना प्रवेश
ठाणे महापालिकेने उपवन तलावाजवळील गावंड बाग येथे फुटबॉल टर्फ उभारण्याचा निर्णय घेतला असून मे. इन्फिनिटी टर्फ एलएलपी या संस्थेला ठाणे मनपा आयुक्तांनी यांच्या मान्यतेने स्वारस्य देकार दिला आहे. त्यानुसार 11 हजार 274 चौरस मीटर जागा या संस्थेला देण्यात येणार आहे. हे मैदान पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. ठाणे मनपा या मैदानात कार्यालय, स्वागत कक्ष आणि स्छच्छतागृहांची उभारणी करणार आहे. वीज आणि पाणीपुरवठाही ठाणे महापालिकाच करणार आहे. कदात्यांच्या पैशातून ठाणे मनपा जागा आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देत असली तरी ठाणे महापालिकेच्या शाळेतील फक्त 10 मुलांनाच इथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इतर सर्वसामान्य करदात्यामुलांना ही संस्था जी फी आकारणार आहे ती परवडण्यासारखी नसल्याचे मत कृष्णा पाटील यांनी व्यक्त करुन यावर अंकुश असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

न परवडणारी फी
आज दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजना असून द्या किंवा बाळकुम येथील शरद पवार मिनि स्टेडियम असू द्या या वास्तू स्व:मालकीच्या असल्या प्रमाणे या संस्था वापरत असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांची फी परवडणारी नाही. सर्व सामान्य करदात्यांना या सुविधा माफक दरात उपलब्ध करुन द्याव्यात,पालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींचा अंकुश असावा अशी मागणी आहे.