क्रेडीट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने बेलसवाडीच्या प्रौढाला लाखांचा गंडा

जळगाव : क्रेडीट कार्ड अ‍ॅक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी प्रौढाची 99 हजार 862 फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
संजीव श्रीराम पाटील (54) हे बेलसवाडी येथील रहिवासी असून शेतकरी आहेत. 3 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यान संजीव पाटील यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे असे संयुक्त क्रेडीट कार्ड आले. कुठल्याही बँकेत अर्ज केला नसतांनाही पोस्टाने क्रेडीट कार्ड आल्याचा संजीव पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला. याच काळात त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन कक्षही बँकेतून बोलत असल्याचे भासविले तसेच पोस्टाने घरी आलेले क्रेडीट कार्ड अ‍ॅक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने संजीव पाटील यांची 99 हजार 862 रुपयांत ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या दरम्यान संबंधिताने विश्वास संपादन करीत संजीव पाटील यांच्याकडून ओटीपी क्रमांक मिळवून त्याद्वारे परस्पर ऑनलाईन खरेदी करीत संजीव पाटील यांच्या खात्यातून पैसे खर्च केले.

सायबर पोलिसात गुन्हा
दोन महिन्यांपासून संबंधितांकडून कुठलाही प्रतिसाद अथवा पैसे परत मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री संजीव पाटील यांना झाली. त्यानुसार त्यांनी सोमवार, 4 एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.