नवी दिल्ली । बॉलिवुडचे शहेनशहा अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण, ज्युनिअर बच्चनने चक्क सरकारी नोकरीसाठी अर्ज केला आहे. क्लार्क परीक्षेसाठी अर्ज केल्यानंतर त्याचे हॉलतिकीट समोर आले असून ते प्रचंड व्हायरलही होत आहे.
आता, तुम्ही बोलाल की अभिनेता अभिषेक बच्चन याला काय कमी आहे आणि तो कशाला सरकारी नोकरीसाठी अर्ज करेल. तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे. सरकारी कामात निष्काळजीपणाचे उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आलं आहे. मात्र, यावेळी यामध्ये नाव जोडलं गेले आहे ते अभिनेता अभिषेक बच्चन याचं. ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या परीक्षेत क्लार्क पदासाठी अर्ज केलेला दिसतोय. इतकचं नाही तर या परिक्षेच्या हॉलतिकीटावर अभिनेता अभिषेक बच्चन याचा सुटा-बुटातला फोटोदेखील आहे. ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’तर्फे ‘मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ’ या पदासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या हॉलतिकिटावर अभिनेता अभिषेक बच्चनचा फोटो दिसत आहे. हॉल तिकिटाचा रोल नंबर 2405283611 असा देण्यात आला असून त्याची जन्मतारीख 1 जानेवारी 1995 देण्यात आली आहे. फोटोखाली असलेल्या सहीमध्ये अभिशेखर बच्चन अशी सही करण्यात आली आहे. या कार्डावर अभिषेकचा उल्लेख ‘महिला’ असा करण्यात आला आहे. तसेच तो लातूरचा रहिवासी असल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हे हॉलतिकीट बोगस असल्याचं दिसून येतं आहे.