चालबाज चोर अटकेत
पिंपरी : घरात ठेवलेले अमेरिकन डॉलर आणि युरो करन्सी, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांची चोरी करणार्याला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने चोरीचे सामान पुणे रेल्वेच्या क्लॉक रूममध्ये ठेवल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार क्लॉक रूममधून चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यात आला. बुद्धदेव बिष्णू बिश्वास (वय 20, रा. चिखली. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी संदीपराव पाटील (वय 36, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी फिर्याद दिली होती.
अज्ञात चोरट्याने पाटील यांच्या घराच्या दरवाजाची कडी खिडकीतून हात घालून उघडली. घरात ठेवलेले 2100 अमेरिकन डॉलर आणि 250 युरो आदी विदेशी चलन तसेच दोन अॅपल आयपॅड, एक लॅपटॉप, डेबिट व क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आंतरराष्ट्रीय ड्राइव्हिंग लायसन्स, युरोपियन हेल्थ कार्ड, घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.
निगडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला रविवारी सकाळी सात वाजता चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन मिळाले. चोरीला गेलेला मोबाईल पुणे रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्या खिशात रेल्वे क्लॉक रूमची पावती मिळाली. क्लॉक रूममधील सामान तपासले असता पाटील यांच्या घरात झालेल्या चोरीतील लॅपटॉप, अमेरिकन करन्सी, युरो करन्सी, डेबिट व क्रेडिट कार्ड, मोबाईल, आयपॉड, आयपॅड, पॅनकार्ड, आंतरराष्ट्रीय ड्राइविंग लायसन्स, युरोपियन हेल्थ कार्ड आणि अन्य कागदपत्रे असे एकूण 3 लाख 58 हजार 656 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.