इंदापूर । प्रत्येकाने स्वतःमधली क्षमता ओळखून त्या विकसीत करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी मांडले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महिंद्रा प्राईड स्कूल व नांदी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करीअर मेळावा प्रशिक्षण शिबीराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय प्रशिक्षण शिबीरामध्ये 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणात अनेक गोष्टी शिकवल्या. त्यामध्ये आणखी वाढ करून जगण्याची कला अवगत करून घ्यावी. तुम्ही ठरवाल ते करू शकता हा आत्मविश्वास बाळगावा. इंग्रजी बोलण्यासाठी शब्दसाठा वाढवला पाहिजे. त्यासाठी दररोज नवीन 5 शब्द पाठ करा. एकमेकांशी इंग्रजीमध्ये बोलण्यास सुरुवात करा, असे कराल तर केवळ 6 महिन्यात इंग्रजी बोलायला शिकाल, असे डॉ. चाकणे यांनी पुढे सांगितले. मंगळवारपासून (28 नोव्हेंबर) दुसरे प्रशिक्षण शिबीर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षिका सुहानी गुप्ते आणि प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी मत मांडले. प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. रोहीत लोंढे, प्रा. फिरोज शेख यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहन व्यवहारे यांनी तर आभार प्रा. सदाशिव उंबरदंड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नामदेव पवार, प्रा. सोमा पिसे, मुकुंद थोरात, अमित जाधव, प्रदीप ओहाळ, मयूर मखरे, दत्ता रास्ते यांनी प्रयत्न केले.