पुरंदर । नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम ही सुरू केली आहे. घरोघरी जाऊन ही तपासणी केली जात आहे. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका क्षयरोगासंदर्भात जनजागृती करीत आहेत, अशी माहिती नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आम्रपाली वेदपाठक यांनी दिली.
संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतले जातात. तसेच क्ष किरण तपासणी मोफत केली जाते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमय तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नीरा व दिवे या गावात ही मोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर मौखिक आरोग्य तपासणी मोहीमही राबण्यात आली असून आरोग्य कर्मचारी घरी जाऊन तपासणी करीत आहेत. यामध्ये तोंडाच्या आतील त्वचेची फनी केली जाते. गालावर व आतील बाजूस काळे डाग, गाठ आहे का ते पाहिले जाते. तंबाखू तोंडाच्या आरोग्याला कशी हानीकारक आहे, याबद्दल माहिती दिली जाते. ग्रामीण भागात महिला व पुरुषांमध्ये तंबाखू व मिश्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अशा ज्या रुग्णांच्या गालात संशयास्पद गाठ आढळून येईल, अशा रुग्णांना कर्करोग तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येत आहे. ही मोहीम 4 ते 18 डिसेंबर या दरम्यान तर मौखिक आरोग्य तपासणी 1 ते 31 डिसेंबर दरम्यान राबण्यात येत आहे. या मोहीमेमध्ये आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आम्रपाली वेदपाठक, फिरोज महात, गणेश जाधव यांचे पथक तसेच आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविकांनी भाग घेतला.