पुण्यासह 13 शहरांचा समावेश : खासगी डॉक्टरांनाही सहभागी करणार
पुणे : क्षयरोगमुक्त (टीबी) महाराष्ट्र करण्याच्या मोहिमेत आता खासगी डॉक्टरांना सामावून घेणारा ’जीत’ प्रकल्प पुण्यासह राज्यातील 13 शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणार्या टीबी पेशंटची नोंद तसेच त्यांची माहिती मिळणे शक्य होणार असून त्यामुळे पेशंटना योग्य त्या उपचारांची दिशा देखील मिळू शकणार आहे.
राज्यासह देशात टीबीच्या पेशंटची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत असून, टीबीच्या पेशंटची आरोग्य विभागाकडे नोंद व्हावी, यासाठी हा आजार नोटिफायबल डिसीज म्हणून जाहीर करण्यात आला आहे. परंतु, सुमारे 20 ते 30 टक्के रुग्णांची सरकारी आरोग्य विभागाकडे नोंद आहे. उर्वरित 70 टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यापैकी 20 टक्के डॉक्टरांकडे उपचार घेणार्या रुग्णांची नोंद सरकारच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आजाराबाबत योग्य उपचार, त्याच्या नोंदी, समन्वय राखला जावा यासाठी आरोग्य विभागाने हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, रायगड, सोलापूर, ठाणे, विरार, वसई, भाईंदर, डोंबिवली, भिवंडी यांचा समावेश आहे. तसेच 23 जिल्ह्यांमध्ये सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.