क्षय रुग्णांना प्रोटीन पावडर द्या

0

मुंबई । क्षय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर प्रतीकात्मक उपाययोजना करताना बाधितांना पौष्टिक आहाराएवजी प्रोटीन (प्रथिन) पावडर द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. प्रशासनाने मात्र ही मागणी फेटाळून लावत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार डॉट्स केंद्रावर आहार देणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईत 21 टक्के क्षयरोगाचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. वर्षभरात सुमारे 25 हजार रुग्णांची नोंद होते. त्यामुळे क्षयरोग रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रुग्णांना पौष्टिक आहार देण्यासाठी प्रत्येक डॉट्स केंद्रावर आहाराचे पॅकेज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता, नगरसेवकांनी आपली मते मांडली. क्षयरुग्णांना रेशनवरून पौष्टिक आहार देण्याऐवजी प्रोटीन पावडर द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली.

मुंबईत क्षयरोग रुग्णांची संख्या वाढतेय
क्षयमुक्तीसाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत सध्या क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असून क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉट्स केंद्रात नोंदणी झालेल्या क्षयरोग रुग्णांना महापालिकेकडून पौष्टिक आहार देण्यासाठी धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना हा आजार होऊ नये, याकरता त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांनाही आहार पुरवला जाईल. यासाठी मे. चेतन स्टोअर्स या कंपनीला कंत्राट दिल्याचे स्पष्टीकरण पालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले.

रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, कर्मचार्‍यांना क्षयाची लागण
पौष्टिक आहार हा केवळ रुग्णांसाठी दिला तर त्यांच्या कुटुंबीयांचाही सरकार विचार करणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. समाजवादी पार्टीचे पालिका गटनेते रईस शेख यांनी एमएमआरडीएच्या इमारतींमुळे या रुग्णांत वाढ होत असल्याचा आरोप केला. प्रशासनाने याबाबतचा अहवाल तयार करावा, अशी सूचनादेखील त्यांनी यावेळी केली. शिवसेनेच्या नगरसेविका समीक्षा सप्रे यांनी रुग्णालयात काम करताना अनेक डॉक्टर व अन्य कर्मचार्‍यांना क्षयरोगाची लागण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आहार पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला कामाचा अनुभव, आहार पुरवण्याची क्षमता आहे का, असा सवाल करत प्रोटीन देण्याच्या मागणीचे समर्थन केले.

2 वर्षांकरिता बाल रुग्णांसाठी 10 हजार पौष्टिक आहार पॅकेट्स
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेमार्फत नोंदणी झालेल्या रुग्णांना त्याप्रमाणे पौष्टिक आहाराचा म्हणजेच धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. दोन वर्षांकरिता प्रौढ रुग्णांसाठी 1 लाख 11 हजार 600 तर बाल रुग्णांसाठी 10 हजार 704 पौष्टिक आहार पॅकेट्सचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये प्रौढ रुग्णांसाठी 631 तर बाल रुग्णांसाठी 461 रुपये प्रत्येक पॅकेट्ससाठी खर्च येईल. एकंदरीत आठ किलो व लहान मुलांसाठी पाच किलोचे पॅकेट्स दिले जाणार आहेत.