क्षुल्लकांना घाबरून संयोजकांची माघार लाजिरवाणे

0
संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी केला भाषणात कठोेर शब्दात प्रहार
यवतमाळ : विशेष प्रतिनिधी
क्षुल्लक विरोधकांना घाबरुन संयोजकांनी माघार घेतली ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? अशा कठोर शब्दात 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी संयोजकांसह मराठीतील तमाम सारस्वतांना केला. एरव्ही अतिशय मृदु भाषेत संवाद साधणार्‍या ढेरे यांनी केलेल्या कान उघडणीमुळे ज्येष्ठ साहित्यिका यांना निमंत्रण नाकारणार्‍या साखळीतील प्रत्येक कडीला घाम फोडला. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समजशाक्तीने उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही,असे त्या गरजल्या.
पहिल्यादिवसापासून वादाचे सावट
इंग्रजी साहित्य लिहिणार्‍या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. मात्र ते इंग्रजीतून लिहितात अशा मुद्दा उकरून काढत मनसेच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याने सहगल यांना आमंत्रित केल्यास संमेलन उधळून लावू अशी धमकी दिली होती. यावर तात्काळ दखल म्हणून सहगल यांना पाठविलेले निमंत्रण मागे घेण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. सहगल यांनी सरकारच्या धार्मिकव्देष्ट्या कारभाराचा निषेध म्हणून साहित्य अकादमीसह सरकारकडून मिळालेले पुरस्कार दोन वर्षांपूर्वी परत केले होते. यातून वाद उफाळून महाराष्ट्र साहित्यक्षेत्र ढवळून गेेले. याच पार्श्‍वभूमिवर संमेलनाच्या अध्यक्षा ढेरे यांनी आसूड ओढले. दरम्यान, सहगल यांच्या ऐवजी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही संयोजकांच्या वर्तनाचे वाभाडे काढले.
ग्रंथदिंडी, पुस्तकप्रदर्शन गर्दीत
दरम्यान, सकाळी सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा सोहळा या संपूर्ण ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाला. ग्रंथदिंडी मध्ये ग्रंथाच्या पालखीसह विविध संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींची झलक पाहायल मिळाली. तसेच पोलीस बँड, शिवसमर्थ ढोल समर्थपथक अशा समुहाचे सादरीकरणही झाले.
…म्हणून साहित्याची अवहेलना
सायंकाळच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षा ढेरे काय बोलतात याकडे सार्‍यांचे लक्ष लागलेले होते. सहगल वादाविषयी आपण निश्‍चित बोलणार आहोत असे त्यांनी वाद उत्पन्न झाल्यादिवशीच घोषित केले होते. त्यानुसार त्या बोलल्या. साहित्यातील शक्तीला आपण नीट ओळखलं नाही. आपल्या हातून तिची अवहेलना झाली, तर आता त्या गोष्टीची भरपाई करण्याची वेळ आली आहे. कोणीही यावं आणि वाडमयबाह्य कारणांसाठी किंवा वाडमयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावे असे आता आपण होऊ देता कामा नये. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र, कित्येकदा लाजिरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादाचा विषय झाली. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तीगांभिर्याने लेखन करणार्‍यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरुप नकोशा वाटणार् याअनेक गोष्टींनी विकृत राहिलं. आपल्यासारखे अनेक जण खंतावत राहिले, पण संमेलनाला येत राहिले. कारण आपल्यापैकी अनेकांसाठी ही पंढरीची वारी आहे. पण ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हे विठूभक्तांच ब्रीद आपण विसरून गेलो. म्हणून संमेलनाला वेठीस धरणार्‍या, भ्रष्ट करणार्‍या आणि साहित्याचं मूल्य शुन्यावर करणार्‍या अनेक बाबींचे आपण बळी ठरलो.
राजकारण झुगारून देण्याची वेळ
आपल्याला साहित्यावरच राजकारण नको आणि साहित्यजगातलं राजकारणही नको आहे. या दोन्ही गोष्ठी झुगारून देण्याची वेळ आली आहे. काय चांगले आणि काय वाईट, काय हितकारकर आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तीजीवनात आणि समूहजीवनातही अनेकदा येते. इतिहासात अशा अनेक वेळा आल्या. अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजाने आपला विवेक जागा ठेवला आहे. आपला विवेक जागा ठेवण्याची ही वेळ आहे.  हा उत्सव पुन्हा निर्मळ करण्याची संधी आहे. सुरूवात आहे पण बदल एका रात्रीत होत नाहीत. सगळे अपेक्षित सकारात्मक बदल तर दीर्घकाळ होत राहतात. ते चिकाटीने करायला लागतील.
माझ्याकडून संयोजकांचा निषेध : देशमुख
मावळते अध्यक्ष देशमुख यांनी सुरुवातीलाच सहगल यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत त्यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्याबद्दल निषेध नोंदवला. सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं ही चीड आणि संताप येईल अशीच गोष्ट आहे. या क्षणापर्यंत घडलेल्या घटनेच्या पापात मी कळत नकळत अप्रत्यक्ष सहभागी आहे. याची खंत वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पाहुण्याला निमंत्रण द्यायचं आणि त्यानंतर त्यांना नका येऊ असं सांगायचं. हे चांगलं झालं नाही, म्हणून मी चिंतेत आहे. देशाची आणि महाराष्ट्राची सहिष्णु परंपरा लोप पावत चालली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशमुख यांनी शेतीप्रश्‍नांवरही भाष्य केलं. सरकारी धोरणामुळं हतबल होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणं हा मार्ग नाही आणि उत्तरही नाही. आत्महत्या करू नका, संघर्ष करा, असं आवाहनही त्यांनी व्यासपीठावरून केलं.
व्यवस्थेने मला विधवा केले
मी साहित्य वाचलेले नाही पण माणसे वाचली आहेत. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे सांगून नवर्याने आत्महत्या केली. कारण माझ्या नवर्याचा या जन्मावर विश्‍वास नव्हता. म्हणून त्याने आत्महत्या केली. पण, माझा या जन्मावर विश्‍वास आहे. मी याच जन्मावर रडत नाही तर लढत आहे. वायद्याची शेती फायद्यात आणेल, अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय मदतीला येते. मला व्यवस्थेने विधवा बनवले आहे. पण मी नाही, तर एकल महिला आहे, अशा शब्दांत आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांची पत्नी वैशाली येडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सहगल यांचे घातले मुखवटे
सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण मागं घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप सुरूच आहे. मराठी सारस्वतांच्या मेळ्याला उत्साहात सुरुवात झाली खरी, पण त्यात निषेधाचे सूरही उमटले. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरू असतानाच, निमंत्रित प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या तीन कवयित्रींनी नयनतारा यांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. यानंतर संमेलनाच्या मंडपात थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महिला पोलिसांनी त्यांना मुखवटे काढून ठेवण्यास सांगितले. त्यांच्याकडील मुखवटे जप्त करून त्यांना मंडपातून बाहेर काढण्यात आले.