सिंधी कॉलनीतील तरुण व्यापार्यावर खाजगी रुग्णालयात सुरु आहे उपचार ; 18 लाखांसाठी मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी
जळगाव : व्यवसायाच्या वाढीसाठी घेतलेले पैसे व्याजासह परत केले. यानंतर पुन्हा 18 लाखाच्या खंडणीसाठी धमकावले जात असल्याने या त्रासाला जाचास कंटाळून बंटी जयपालदास गेही (25, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) या तरुण व्यापार्याने सोमवारी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच उपचार मिळाल्याने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या बाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यासह पोलीस उपअधीक्षकांकडे तक्रारी करुनही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तक्रार दाखल केली म्हणुन संबधीतांनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे गेही परिवारा तर्फे सांगण्यात आले.
दोघांकडून मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी
बंटी गेही याने दोन दिवसापूर्वी सहायक पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीनुसार, बंटी याचे बजरंगी प्लास्टीक नावाने बळीराम पेठेत प्लास्टीक भांडे विक्रीचे दुकान आहे. यश सर्वानंद किंगराणी (23) व अजय किसनचंद मंधान (28) दोन्ही रा.सिंधी कॉलनी यांचा दुकानावर वावर असल्याने त्यांच्याशी ओळख निर्माण झाली होती. दोघं जण व्याजाने पैसे देत असल्याचे समजल्यानंतर बंटी याने व्यवसायवृध्दीसाठी यश व अजय या दोघांकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले. चार, पाच महिन्यांनी दोघांचे पैसे व्याजासकट परत केले. मात्र दोघांनी व्याजापोटी आणखी पैशाचा तगादा लावला. 18 मे 2019 रोजी एका हॉटेलमध्ये दोघांनी पुन्हा पैशासाठी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
पोलिसात तक्रार दिल्याने जीवे मारण्याची धमकी
याप्रकरणी दोन वेळा पोलिसात तक्रारी दिल्या. त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. परंतु, पुढे काहीच कारवाई झाली नाही. उलट पोलिसात तक्रार दिली म्हणून संबंधितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तसेच काही पोलिसांना हाताशी धरुन खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी दिल्याचे गेही परिवारातर्फे सांगण्यात आले. सहायक पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनानंतर तीनच दिवसात बंटी याने आत्महत्येचा प्रयत्न केला. बंटी याच्यावर डॉ. भंगाळे यांच्या रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच तणावात वडील जयपालदास गेही यांचा मृत्यू झाला असून आईसह माझ्या जीवाला धोका आहे. काही बरेवाईट झाल्यास त्याला यश किंगराणी व अजय मंधान हेच जबाबदार असतील, असे बंटीने तक्रारीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांकडून घटनेची दखल घेतली असुन संशयीतांचा शोध सुरु असल्याचे समजते.