पिंपरी चिंचवड : भंगार दुकानातील कामगारांना चौकशीला आणून, त्यांना बेदम मारहाण करून साडेआठ लाख रुपये घेतल्या प्रकरणात गुन्हे शाखेतील तीन पोलिसांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे, तर सहायक फौजदारासह दोघांच्या निलंबनाचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिले आहेत. या प्रकरणी इस्तीयाक उर्फ मुस्ताक महलू खान (30, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
इतर सहकार्यांवर गुन्हा दाखल…
गुन्हे शाखेचे सहायक फौजदार रमेश नाळे आणि केदारी यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर इतर सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह पोलीस कर्मचारी किरण लांडगे, स्वप्नील शिंदे आणि सचिन अहिवळे या तिघांना तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी सलग्न करण्यात आले आहे. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्याकडे दिली असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली.
कामगारांना बेदम मारहाण करणे भोवले…
रमेश नाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी 20 नोव्हेंबरला रात्री आणि 21 नोव्हेंबर रोजी रात्री खान यांच्या भंगार दुकानातील कामगार सुमित यादव, अब्दुल खान, सर्वेश गौतम, मोहम्मद खान, अब्दुल करीम खान, वसीम खान, अनुकुमार खान या सर्वांना चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात आणले. चोरुन आणलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी घेत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी रमेश नाळे यांनी चौकशी करुन कामगाराना बेदम मारहाण केली. तसेच त्यातील एकाला विजेचा शॉक देखील दिल्याचे आरोप होत आहेत. या सर्वांना आणि मालकाला गुन्हा दाखल न करता सोडून देण्यासाठी नाळे यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. इस्तीयाक उर्फ मुस्ताक महलू खान यांच्याकडून साडे पाच लाख रुपये आणि भागीदार धनराज अकोदीया यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन सोडून दिले.