तीन चाकूंसह दरोड्याचे साहित्य जप्त ; बाजारपेठ पोलिसांची कामगिरी ; भुसावळ दरोडा टाकण्याचा होता आरोपींचा डाव
भुसावळ- खंडव्याच्या लाकूड व्यापार्याला शस्त्रांचा धाक दाखवत त्याच्याकडील तीन लाखांची रक्कम हिसकावून महामार्गावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून तीन धारदार चाकूंसह, मिरची पावडर व दरोड्याचे साहित्य, लूटीतील तीन लाखांची रोकड तसेच दोन चारचाकी तसेच आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहेत.
खंडव्याच्या व्यापार्याला लुटल्याने घटना उघड
खंडवा येथील लाकडाचा व्यवसाय करणार्या पासी नामक व्यापार्याकडून 16 रोजी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरून आरोपींनी तीन लाखांची रक्कम लांबवली होती. या घटनेची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शहरात सर्वत्र संशयीतांचा शोध घेतला मात्र ते आढळले नाहीत. संशयीत महामार्गावरील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचला. आरोपी जेवण करीत असताना पोलिस आल्यानंतर ते पळू लागले मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
तीन लाखांची रोकडसह दरोड्याचे साहित्य जप्त
आठही आरोपींच्या ताब्यातून तीन लाखांची रोकड, मिरची पूड, एक लाख रुपये किंमतीची चारचाकी इंडिका (एम.पी.10 सी.ए.2083) तसेच तीन लाख रुपये किंमतीची महिंद्रा व्हेरीटो (एम.एच.30 ए.एफ.4902, एक चाकु व दोन सुरे, लोखंडी पकड, स्क्रू ड्रायव्हर, सुती दोरीचे बंडल, 21 हजार रुपये किंमतीचे आठ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, एएसआय अंबादास पाथरवट, तस्लिम पठाण, सुनील थोरात, दीपक जाधव, संजय भदाणे, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, संदीप परदेशी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या आरोपींना केली अटक
डिगंबर वासुदेव कुचके (42, रा.हाथा, ता.बाळापुर, जि.अकोला), संतोष सुकलाल करमा (40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र.), दिलीपसिंग नथ्थुसिंग चव्हाण (40, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र)), नारायणसिंग गोकुळसिंग राजपुत (44, रा.टोकसर, ता.बडवा, जि.खरगोन, (म.प्र), नाना जगन सोनी (37, रा.सनावद, ता.बडवा, जि.खरगोन (म.प्र), नंदलाल हरीप्रसाद विश्वकर्मा (46 ,रा.खडका ता.भुसावळ), शेषराव पांडुरंग राठोड (47 ,रा.शिरसोली, ता.तेल्हारा, जि.अकोला), अकबर उस्मान तंबोली (35, रा.बिंदिया नगर, खडका, ता.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.