खंडाळा घाटात भाविकांच्या बसला अपघात

0

लोणावळा : पुण्यावरून खोपोलीकडे गगनगिरी महाराज आश्रमात दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी खंडाळा घाटात शिंगरोबा मंदिराजवळ घडली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस उलटली. या अपघातात बसमधील 20 ते 25 भाविकांना किरकोळ स्वरुपात दुखापत झाली आहे. बे्रक फेल झाल्यानंतर सुदैवाने ही बस घाटातील एका झाडात अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा घाटातील खोल दरीत बस कोसळण्याची शक्यता होती. अपघातानंतर रस्त्यावरील वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून बसमधील भाविकांनी बाहेर काढले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बसमध्ये होते 30 प्रवासी
पुण्यातील एकता योगा ट्रस्ट, पुना केंब्रिज विद्यालय आणि ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पुणे केंब्रिज पब्लिक स्कूलच्या मिनी बसने 30 भाविक रविवारी पुण्यावरून खोपोलीकडे गगनगिरी महाराज आश्रमात दर्शनासाठी जात होते. ही बस खंडाळा घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.

क्रेनच्या सहाय्याने बस काढली बाहेर
या अपघातानंतर घाटातील दरीच्या कडेला झाडात अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आले होते. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत हे मदतकार्य सुरू होते. दरम्यान, पोलिसांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.