खंबाटकी घाटातील धोकादायक वळण काढणार

0

पुणे । बेंगळुरू महामार्गावर अनेक प्राणघातक अपघातांचे कारण ठरलेले खंबाटकी बोगद्याबाहेरील एस आकारातील वळण अखेर काढून टाकण्यात येणार आहे. आता खंबाटकी बोगद्यातून बाहेर आल्यानंतर वाहनचालकांना तीव्र उतार आणि या एस वळणावरून जाण्याची आवश्यकता राहणार नाही. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर पुण्याच्या दिशेला येण्यासाठी लवकरच सरळ रस्ता करण्यात येणार असल्याने येथील अपघातांचा धोकाही नाहीसा होणार आहे. सातार्‍याकडून पुण्याच्या दिशेला येण्यासाठी खंबाटकी बोगद्याचा वापर करावा लागतो. या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर एस आकाराचे वळण व तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे बोगद्यातून वेगात आलेल्या वाहनांवर नियंत्रण मिळवले नाही, तर अपघात होत होते.

2015 मध्ये वळण सरळ करण्याचा निर्णय
या ठिकाणी गेल्या काही वर्षांत मोठे अपघात झाले असून, चार ते पाच अपघात भीषण झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यात सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबर 2015 मध्ये हे वळण सरळ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रिलायन्स इन्फ्राला त्याबाबतची सूचना केली होती. त्या ठिकाणी केवळ रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली असून, त्यामुळे ‘एस’ वळणात फारसा फरक पडलेला नाही. परिणामी, हे एस आकाराचे वळण वाहन चालकांसाठी अद्यापही कर्दनकाळ ठरत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी संपूर्ण नवीन रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्याला येण्यासाठी दोन बोगदे
सातारा जिल्हाधिकार्‍यांकडून या नवीन रस्त्यासाठी भूसंपादन करून दिले जाणार आहे, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागातील अधिकार्‍यांनी दिली. हा नवीन रस्ता आणि प्रस्तावित बोगदा याचे काम एकाच कंत्राटदाराकडून केले जाणार आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. सातार्‍याला जाण्यासाठी सध्या खंबाटकी घाटातून जावे लागते. मात्र, हा घाट टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा करण्याची घोषणा केली होती. त्या बोगद्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला असून, हा बोगदा सहा लेनचा होणार आहे. म्हणजेच, या बोगद्यातून सातार्‍याला जाणार्‍या वाहतुकीबरोबरच पुण्याच्या दिशेला येणार्‍या वाहतुकीसाठीही तीन लेन प्रस्तावित आहेत. त्यामुळे येत्या काळात पुण्याला येण्यासाठी दोन बोगदे होणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या बोगद्याच्या उजव्या बाजूस हा बोगदा होणार आहे.