खडकनाला कोदगाव धरणाजवळ भरते आदीवासी विद्यार्थ्यांची शाळा

0

* गरीब मुलांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद
* शासनाच्या पायाभूत सुविधांपासून वंचित
* सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे भरीव सहकार्य
चाळीसगाव – शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर कोदगाव धरण असून धरणाच्या भिंतीजवळ भिल्ल समाज बांधवांची वस्ती आहे. ही खडकनाला भिल्ल वस्तीत एक शिक्षक असलेली पत्र्याच्या तुडक्या मुडक्या शेडमध्ये प्राथमिक शाळा भरते या विद्यार्थ्यांच्या पालक मोलमजुरी करणारे असल्याने ही गोरगरीब मुले आजही शासनाच्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. नेमकी ही समस्या बघून शहरातील रोटरी क्लब ऑफ संगमच्यावतीने व सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. गोरगरिबांची मुलांना नवीन दफ्तर व शालेय साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या रोटरी क्लब ऑफ संगमच्या अनोख्या उपक्रमाची तालुक्यात मोठी चर्चा होती

४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
चाळीसगाव रोटरी क्लब ऑफ संगमच्या वतीने भास्कराचार्य इंटरनँशनल स्कुल तसेच लिटील भास्करा प्री स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने कोदगाव भिल्ल वस्ती (खडकनाला) येथील आदिवासी विद्यार्थ्यांना रोटरी क्लबचे तथा चाळीसगाव एजुकेशन सस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ बाळासाहेब चव्हाण, रोटरी संगम क्लबचे अध्यक्ष सुधीर पाटील, डॉ.प्रशांत शिनकर, भास्कराचार्य स्कुलचे प्रमुख प्रा.उमाकांत ठाकुर व रोटरी संगमचे सचिव प्रशांत कोतकर यांच्याहस्ते ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना बाळासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुधीर पाटील यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सर्व घटकांनी येण्याची गरज विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख रोटे उमाकांत ठाकुर यांनी केले. भास्कराचार्य स्कूल नागद शाखेच्या प्राचार्य श्रद्धा ठाकुर, दिपक ठाकरे, पंकज पवार, विजय राजपूत, गोविंद मोरे, ग्रा.पं.सदस्य उज्वला पवार आदींनी परिश्रम घेतले

मुलांच्या अवस्थेने मने गहिवरले – प्रा. उमाकांत ठाकुर
शहरापासून हाकेच्या अंतरावरील शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजची अवस्था पाहून त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी आम्ही या विद्यार्थ्यांना गणवेश व इतर पूरक साहित्य देखील देणार आहोत. पोट भरण्याची चिंता असलेल्या पालकांसमोर मुलांना चांगले शिक्षण मिळावी अशी भावना आहे. मात्र आर्थिक परिस्थिती अभावी त्यांची हतबलता पाहून आमच्या सर्व पदाधिकारी गलबलले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले जातील, अशी भावना प्रोजेक्ट चेअरमन प्रा.उमाकांत ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केली.