खडकवासला नामांतरास विरोध

0

पानशेत । खडकवासला धरणाचे महात्मा फुले नामविस्तार अभियान असे फ्लेक्स सिंहगडरोड परिसरात काही दिवसांपासून लावले आहेत. खडकवासला धरणाचे नाव महात्मा फुले खडकवासला धरण असे करण्यासाठी काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. या नामांतरास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खडकवासला येथे मंगळवारी (दि.28) रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत खडकवासला नागरी कृती समितीने हवेली पोलीस तसेच पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांना निवेदन दिले आहे.

खडकवासला ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.24) खडकवासला येथे ग्रामसभा घेऊन धरणाच्या नामांतरास तीव्र विरोध केला. खडकवासला धरणाचे महात्मा फुले नामविस्तार अभियान असे फ्लेक्स सिंहगडरोड परिसरात काही दिवसांपासून लावले आहेत. खडकवासला धरणाचे नाव महात्मा फुले खडकवासला धरण असे करण्यासाठी काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होणार आहे. महात्मा फुले यांच्याबद्दल आदर आहे. खडकवासला धरण हे ऐतिहासिक नाव असून खडकवासला गाव आणि परिसरातील ग्रामस्थांची अस्मिता यामुळे जिवंत आहे. नामांतरासाठी कोणत्याही रॅलीस परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

ऐतिहासिक दृष्ट्याही महत्त्व
1879 मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या खडकवासला धरणात ग्रामस्थांची शेकडो एकर जमीन, घरे बुडाली आहेत. राष्ट्रासाठी येथील शेतकर्‍यांनी त्याग केला आहे. खडकवासला तसेच परिसरातील शेतकर्‍यांनी एक रुपयाचाही मोबदला घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1650च्या सुमारास मुठा नदीवर खडकवासला आणि कोपरे गावाच्या वेशीवर भिकारदरा येथे छोटे धरण बांधले होते. त्यांनंतर इंग्रजांनी पुण्याच्या पाण्यासाठी त्याच ठिकाणी खडकवासला धरण बांधले. ऐतिहासिकदृष्ट्या खडकवासला नावाला महत्त्व आहे. त्यामुळे हजारो मावळे, ग्रामस्थांच्या अस्मिता खडकवासला धरण या नावाने जिवंत आहेत. त्यामुळे खडकवासला धरणाचे नाव बदलू नये, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र लढा उभारला आहे.