खडकीत कारवाईनंतरही बेकायदेशीररित्या सिलिंडरची विक्री

0

बडगा दाखवूनही परिस्थितीत जैसे थे; आडकाठी करणार्‍यांवर कारवाई नाही

खडकी । खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधी पथकाने बिझनेस सेेंटरजवळ गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याने नुकतीच कारवाई केली होती. या सेंटरमध्ये ज्वलनशील वस्तू, दारूचे दुकान आणि कटिंग सलून अशा दुकानांना परवानगी नाही. त्यामुळे येथे अवैधरित्या सिलेंडरची विक्री केली जात असल्याने कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु कारवाईनंतरही परिस्थिती आहे तशीच आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या भागात सिलेंडरसारख्या स्फोटक पदार्थाची विक्री करणार्‍या व्यावसायिकावर बोर्डाने कठोर कारवाई का केली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दुकानांबाबत 20 वर्षांचा करार
बोर्ड प्रशासनाने खडकी बिझनेस सेंटर तयार करताना ज्वलनशील वस्तू, दारूचे दुकान आणि कटिंग सलूनचे दुकान टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. बिसनेस सेंटरच्या तयार केलेल्या नियमावलीत परवानगी नसल्याचे बोर्डाचे महसूल अधीक्षक भगीरथ साखळे यांनी सांगितले. सुरक्षेच्या द्दष्टीने प्रशासनाने सेंटरमधील दुकाने, भाडेकरू आणि बोर्ड प्रशासनादरम्यान करार केलेला असून हा करार 20 वर्षांसाठी आहे. ज्वलनशील वस्तूंची परवानगी नसल्याने सेंटरमध्ये हॉटेल, दारू, बियर शॉपी आणि कटिंग सलून टाकण्यास परवानगी नाही.
तरीही सेंटरमध्ये गॅस सिलेंडर पुरवठा करणारे ऑफिस आहे. गॅस सिलेंडर देण्यासाठी सेंटरच्या मागील बाजूस टेम्पो उभा करण्यात येतो. टेम्पोमधून गॅस सिलेंडरची विक्री होत असतानाच बोर्डाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करीत 51 घरगुती आणि 16 व्यावसायिक वापरासाठीचे असे एकूण 67 सिलेंडर जप्त केले होते. मात्र बोर्डाचे सदस्य सुरेश कांबळेˆयांनी कार्यालयाच्या जवळ गाडी अडवून धरली आणि कारवाई करू नये अशी भूमिका घेतली. त्यावेळी बोर्डाचे सदस्य कांबळे आणि वाईकर यांच्यात शाब्दिक वादही झाला होता. मात्र सामोपचाराने वाद मिटवून घेतल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

जप्त सिलेंडरची नोंद नाही
बोर्डाच्या पथकाने कारवाई केली असेल तर जप्त केलेल्या सिलेंडरची नोंद बोर्डाच्या वहीत आहे का, तसेच ते सोडवून नेले असल्यास रितसर दंडची रक्कम जमा केली आहे काय? असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते मदन गाडे यांनी उपस्थित केला आहे. अतिक्रमण कारवाई करताना लोकप्रतिनिधीकडून त्यात अडथळा केला गेला तर त्या लोकप्रतिनिधीचे पदच रद्द होऊ शकते, असे गाडे यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात अनधिकृतरित्या सिलेंडरची विक्री करणार्‍या व्यावसायिकावर आणि सदस्याबाबत बोर्ड प्रशासन कोणती पावले उचलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.