खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये गवत वाढल्याने सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका

0

गवत कापण्याची छावा मराठा संघटनेची मागणी

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट रेंज हिल सी टाईप येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. मात्र, तक्रार करूनही गवत कापले जात नाही. त्यामुळे येथे सापाचा वावर वाढला आहे. परिणामी नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाढलेले गवत कापण्यात यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, छावा मराठा संघटनेतर्फे खडकी कॅन्टोन्मेंटकडे करण्यात आली आहे. लवकरात लवकर गवत न कापल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेमार्फत देण्यात आला आहे.

विविध संघटनांनी मागणी करूनही दुर्लक्ष…
गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याबाबत गणेशोत्सवात शिवशक्ती मित्र मंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे गवत कापण्याची मागणी केली होती. मात्र, कोणताही कर्मचारी गवत कापण्यासाठी आला नाही. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत: गवत कापले. नवरात्रोत्सवात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी अर्ज करून गवत कापण्याची मागणी केली. मात्र, गवत न कापताच कर्मचारी सही घेण्यासाठी आले. याठिकाणी अनेकदा सापही निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्पदंश होऊन दगावण्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचार्‍यांना याचे कसलेही सोयर सुतक नाही. त्यामुळे या कामगारांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, वाढलेले गवत न कापल्यास छावा मराठा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.