शिरपूर । ‘स्वप्न हे झोपेत येतात, मात्र खरे स्वप्न ती असतात, जी झोपूच देत नाहीत’ दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे हे विधान युवकांना प्रेरणा देणारे आहे. आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे तेवढेच खरे आहे. शिरपुर तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेवरील काकडमाड या आदिवासी अतिदुर्गम लोकवस्तीच्या गावातील रोकसिंग सुरता पावरा या विद्यार्थ्यांने नियोजनपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर सातत्यपूर्ण अभ्यास करूण डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. सतरा विश्वे दारीद्रयाने पुजलेला व एका वेळेची जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी समाजातुन डॉक्टर झालेल्या रोकसिंगचे समाजातुन कौतुक होत आहे.
परिस्थितीवर केली मात
इयत्ता 10 वी पर्यतचे शिक्षण आश्रम शाळा, वाघाडी येथे झाले आहे. बारावीत शेवटच्या बेंचवर बसणारा रोकसिंग एम.एच.सिईटी परीक्षेत अव्वल मार्क मिळवुन राज्यात मागासप्रवर्गातून मेरीटमध्ये आला होता. आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन दिल्यास ते नक्कीच जीवनात यशस्वी ठरू शकतात, याचे उदाहरण म्हणून रोकसिंगकडे बघता येईल. अतिशय हालाखीच्या परिस्थितीवर मात करून डॉक्टर झालेल्या रोकसिंगने बोराडी सारख्या आदिवासी दुर्गम क्षेत्राच्या लौकीकात मानाचा तुरा रोवला आहे.
कुटुंबियांची मोलाची साथ
काकडमाड हे आदिवासी अतिदुर्गम क्षेत्रातील गाव आहे. दोन वर्षापुर्वी येथे रस्ता, विज सारख्या भौतिक सुविधाही पोहचलेल्या नव्हत्या. काकडमाड ते पळासनेर हे 15 किमीचे अंतर डोंगरदर्यातुन पायपिट करुन यावे लागत असे. घरात कोणी शिकलेली व्यक्ती नव्हती,े. रोकसिंगचे आईवडील निरक्षर आहेत. मोलमजुरी करुन आपला उर्दरनिर्वाह करतात. त्याचा मोठा भाऊ व वहीनी त्याच्या शिक्षणाच्या खर्चासाठी नाशिकला मजुरी करताहेत. रोकसिंगला लहानपणापासूनच त्याला वैद्यकीय क्षेत्राची आवड होती. मात्र, आपल्याकडून शिक्षणाचा खर्च पेलवणार नाही, याभीतीने त्याने प्रवेशासाठी नकार दिला, परंतु घरच्यांनी त्याला धीर देऊन कोणत्या प्रकारचे शैक्षणिक खर्च, काहीही मोलमजुरी करुन भागविण्याची हिम्मत दाखवली.