मुंबई (निलेश झालटे) । माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अखेर राज्यसभेसाठी तयार झाले असले तरी एकनाथ खडसे यांनी मात्र दिल्लीला जाण्यास ठाम नकार दर्शवला आहे. आपण राज्यातच राहून जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले. सोमवारी राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा डाव फसला!
राज्यसभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते. त्यांना मंत्रीमंडळात नारायण राणे आणि एकनाथ खडसे हे दोघेही नको आहेत, असे बोलले जाते. राज्यसभेच्या निमित्ताने त्यांना ही संधी चालून आली होती. राणेंची मनधरणी करण्यात त्यांना यश आले मात्र नाथाभाऊंनी हा प्रस्ताव धुडकावला आहे. त्यामुळे प्रकाश जावडेकर, राणे आणि तिसर्या जागेसाठी व्ही. मुरलीधरन यांची निवड झाली आहे. त्यामुळे विधिमंडळात खडसेंचा आवाज पुन्हा धुमताना दिसेल.