खडसेंचा निर्णय चुकला हे लवकरच कळेल; गिरीश महाजनांचा टोला

0

जळगाव: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाजन-खडसे यांच्यात दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडत आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठे भगदाड पडेल असे बोलले जात आहे. मात्र महाजन यांनी हा दावा फेटाळला असून जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात खडसे यांच्या जाण्याने भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. दरम्यान केळी पिक विम्याबाबत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयात आमदार महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे पदाधिकारी आले होते. यावेळी महाजन यांनी पुन्हा खडसे यांना टोला लगावला आहे. खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय चुकला का? यावर बोलतांना महाजन यांनी खडसे यांचा निर्णय चुकला हे लवकरच कळेल असे सांगितले. खडसे यांना कोणते पद मिळणार? हे ते जानो आणि राष्ट्रवादी जानो असेही महाजन यांनी सांगितले.

भाजपातील १२-१५ माजी आमदार खडसे यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे, मात्र खडसे यांच्यासोबत किती आमदार आणि माजी आमदार आहेत, हे देखील स्पष्ट झाल्याचा टोला महाजन यांनी लगावला.