खडसेंचा राजकीय प्रवास पाहता मोठ्या हालचाली सुरु!

0

राष्ट्रवादीमध्ये खडसे यांचे कधीही स्वागत- प्रदेशाध्यक्ष तटकरे

मुंबई:- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा राजकीय प्रवास फार मोठा आहे. महाराष्ट्रात भाजप मोठे करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. ते जमिनीशी जुळलेले नेते आहेत. सध्या त्यांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांशी वाढत्या भेटी पाहता मोठ्या हालचाली वाटत आहेत. आमच्याकडे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खडसे यांच्या नाराजीविषयी जनशक्तिशी बोलताना मत व्यक्त केले.

खडसे यांनी भूमिका स्पष्ट करावी
खडसे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, भाजपात एकच नाना पटोले नाहीत हे मी आधीच म्हटलं होतं. अनेकांची नेतृत्वावर नाराजी आहे. खडसे यांनी सोडण्याची भूमिका स्पष्ट करावी. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावर आम्ही पक्षामध्ये कुठल्याही मोठ्या नेत्याचे स्वागत करायला तयार आहोत, असे तटकरे म्हणाले. तटकरे म्हणाले की, खडसे यांच्या मनात भाजपा सोडायच नाही पण भाजपला त्यांना बाहेर ढकलायचे. तसे झाले तर आमच्याकडे स्वागतच आहे असे ते म्हणाले.

भाजपमध्ये अनेकजण अस्वस्थ
राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांना तिथे काय मानपान आहे. पक्षात स्थान काय आहे हे अनुभवायला मिळाले आहे. त्यांच्या मनातील अस्वस्थता अनेक भेटींमध्ये व्यक्त होतेय, असेही तटकरे म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढेल. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्यक्षात कधी हे मात्र काळ ठरवेल. हा भाजपच्या अतिरेकचा हा परिणाम असल्याचे तटकरे म्हणाले.