खडीने भरलेल्या मालगाडीचा डबा पारसजवळ घसरला

0

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ; सात गाड्या धावल्या उशिराने

भुसावळ- खडी वाहून नेणार्‍या मालगाडीचा डबा रेल्वे रूळाखाली उतरल्याची घटना शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पारस रेल्वे स्थानकाजवळ घडली. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक परीश्रमानंतर अपघातग्रस्त डबा रेल्वे रूळावर आणला मात्र यामुळे नागपूरकडे भुसावळकडे येणार्‍यात तब्बल सात गाड्यांना विलंब झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

अपघातानंतर भुसावळातून यंत्रणा रवाना
मध्य रेल्वेच्या पारस रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर अप मार्गावर खडी वाहून नेणार्‍या मालगाडीच्या एका डब्याचे (बीओबीवायएन) चाक निखळल्याने विभागात रेल्वे अपघाताची सूचना देण्यात आली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने विविध स्थानकांवर गाड्या थांबवण्यात आल्या. भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अपघात रीलिफ व्हॅनसह अत्याधूनिक जॅकद्वारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर रूळाखाली निखळलेला डबा पुन्हा रूळावर आणण्यात यश आले.

सात गाड्या धावल्या विलंबाने
मालगाडीच्या डब्याला झालेल्या अपघातामुळे नागपूरकडून येणारी गितांजली एक्स्प्रेस दोन तास 20 मिनिटे तर प्रेरणा एक्स्प्रेस दोन तास, गोंडवाना एक्स्प्रेस एक तास, जादा गीतांजली एक्स्प्रेस एक तास, अजमेर पुरी एक्स्प्रेस 40 मिनिटे तर डाऊन मार्गावरील अहमदाबाद हावडा ही गाडी भुसावळ स्थानकावर थांबवण्यात आल्याने ती दोन तास उशिराने धावली तसेच मुंबई-हावडा गीांजली एक्स्प्रेस एक तास उशिराने धावली.