खड्डे न बुजविल्याने आळंदीत धूळ जास्त

0

काम पुर्ण करण्याचे दिले आदेश

आळंदी : गेल्या काही दिवसांपासून आळंदी देवस्थानला जाणारा रस्त्याचे डांबरीकरण काढून सिमेंट रस्ते बनविले आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटचे रस्ते बनविले असले तरीही या रस्त्यांवरील धूळ कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट काम सोडल्याने तेथे धुळीचे साम्राज्य आहे. माउलींचा संजीवन समाधी सोहळा 30 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी विविध शासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा आणि धूळ सफाई करण्याचा आदेश नगरपालिकेला दिला. पालिकेने मंगळवारी सायंकाळी लगेचच खड्डे बुजविण्यास सुरवात केली, मात्र त्यासाठी मुरुमाऐवजी लाल मातीचा वापर केला. त्यामुळे खड्डे तर बुजलेच नाहीत, परंतु धुळीचा त्रास आणखी वाढला.

पदपथाचे काम अर्धवट

प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपुरा मार्ग, चर्‍होली रस्ता या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता केला. मात्र, त्या ठिकाणी ठेकेदाराने राडारोडा न उचलल्याने धूळ तशीच पडून आहे. अनेक ठिकाणी पदपथाचे काम अर्धवट आहे. देहूफाटा ते नवीन पुलापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर टपाल कार्यालयासमोर इमारतींचा राडरोडा तसाच असून, इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. आळंदीमध्ये झालेल्या बैठकीत प्रांत आयुष प्रसाद यांनी सांगितले की, माझे एक मित्र तिरुपती येथे प्रशासकीय सेवेत आहेत. ते आळंदीत आले असता त्यांनी विकासकामांबाबत नाराजी व्यक्त केली. आळंदीत शंभर कोटी रुपये खर्च केले. मात्र, कामाला झळाळी दिसत नाही. तिरुपतीला स्वच्छता आहे, तशी इथे दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या वारीत धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी ठेकेदार आणि पालिकेने रस्त्यावर राडारोडा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक असलेल्या ठिकाणी योग्य ती रंगरंगोटी करून घ्यावी.