मुंबई । जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील 50 सोसायट्यांनी मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन पद्धतीला प्रतिसाद देत खतनिर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महापालिकेने त्यांना कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचे मोठे डबेही उपलब्ध करून दिले आहेत. सोसायट्यांमध्ये ओल्या कचर्यापासून खतनिर्मितीसाठी मुंबई महापालिकाकडून शून्यकचरा अभियान राबवण्यात येत आहे. त्यानुसार येत्या जानेवारीपासून पालिका ओला कचरा घेणे बंद करणार आहे. 20000 चौरस मीटर आणि त्यापेक्षा मोठ्या जागेवर बांधकाम असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना ओल्या कचर्याची विल्हेवाट स्वत:ला लावावी लागणार आहे.
कचरा डब्यांमध्ये टाकून तीन वेळा फिरवावा लागेल
स्थानिक आमदारांच्या निधीतून आणि स्थानिक नगरसेवक रोहन राठोड यांच्या पुढाकाराने ही खतनिर्मिती करण्यात येणार आहे. स्वयंपाकगृहातील ओला कचरा खत निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये भाज्यांचा टाकाऊ भाग, शिळे अन्न आदींचा समावेश असेल. हा ओला कचरा या डब्यांमध्ये टाकून दिवसातून तीन वेळा तो फिरवावा लागेल. 21 ते 30 दिवसांमध्ये त्यापासून खतनिर्मिती होणार आहे. यामुळे त्या रहिवाशांना कचर्यापासून खत मिळेल. ते खत परिसरातील झाडांसाठी वापरता येईल. जास्त खत झाल्यास त्याची विक्री करून पैसेही मिळवता येतील, असे नगरसेवक राठोड यांनी सांगितले.