संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक ज्ञानेश्वर आमले यांची तक्रार
भुसावळ- महामार्ग चौपदरीकरणासाठी अवैधपणे खोदकाम होत असल्याची लेखी तक्रार संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर आमले यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे. साकरी शिवारातील गट नंबर 254 मधून अवैधपणे होणारे गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक तत्काळ थांबवून दंडात्मक कारवाई करावी, या मागणीसाठी आमले यांनी अर्ज दिला होता. त्यानुसार मौजे साकरी सजा खडके येथील तलाठींनी टाटा कंपनीचे डंपर (क्र.एमएच.19-सी.वाय.2116) पकडले. त्यानंतर भुसावळ तहसीलदारांनी पथक घटनास्थळी पाठवले. तेव्हापासून 20 डिसेंबरपर्यंत हे डंपर तालुका पोलिस ठाण्यात लावले होते मात्र जिल्हाधिकार्यांनी आयुष प्रोकॉनला 17 डिसेंबरला साकरी शिवारातील 280 गटनंबर मधून उत्खननाची परवानगी दिल्याने हे वाहन सोडून देण्यात आले. यासह साकरी शिवारातील गटनंबर 280/2 व लगतच्या एमआयडीसी परीसरातून तब्बल 26 हजार 779 ब्रास अर्थात 40 ते 50 हजार ब्रास गौण खनिजाची तब्बल एक कोटी 76 लाख रुपये स्वामित्व निधी बुडवण्यात आला असल्याचे जिल्हा परीषद अभियंत्यांच्या पाहणीतून समोर आले आहे. एकंदरीत तालुक्यातील खनिज संपत्ती ओरबडली जात असून या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा आमले यांनी दिला आहे.