तरुण गंभीर : वाल्हेकरवाडीतील घटना
पिंपरी-चिंचवड : पोलिसांचा खबर्या असल्याच्या संशयातून तरुणावर वार करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 25) दुपारी चारच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे घडली. प्रदीप दादासाहेब पळसकर (वय 30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तरुणाने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश भाऊसाहेब कोळपे (वय 32, रा. शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
आरोपी सराईत गुन्हेगार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळपे हा सराईत गुन्हेगार आहे. मागील काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. त्याच्याकडून सोने हस्तगत केले होते. आपल्याला पकडून देण्यासाठी प्रदीप याने पोलिसांना खबर दिली, असा संशय कोळपे याच्या मनात होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रदीप त्याच्या मित्रांसोबत राहुल भालके या मित्राला मुलगा झाल्याच्या आनंदात वाल्हेकरवाडी येथील एका शेतात दारू पित बसला होता. दुपारी चारच्या सुमारास तो जेवण करून उठला. त्यावेळी कोळपे हा तिथे आला. त्याने प्रदीपवर कोयत्याने वार केला. यामध्ये प्रदीप गंभीर जखमी झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.