युद्ध नको बुद्ध हवा…, …आणि बुद्ध हसला!, ही दोन वाक्यं गौतम बुद्धांंच्या तात्त्विक मूल्यांशी कायमच जोडली जातात. मुळात बुद्ध जरी भारत वर्षात जन्मला असला, तरीही त्यांच्या विचारांमुळे ते जगभर पोहोचले आहेत. याच वास्तवामुळे उपरोक्त दोन्ही वाक्यं जागतिक पातळीवर आपलं महत्त्व निर्देशित करण्याकरिता कायम वापरली जातात. यातील पहिले वाक्य युद्ध नको बुद्ध हवा… हे वाक्य जगभरात आज जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी चपखल बसते. तर…आणि बुद्ध हसला! हे वाक्य सर्वप्रथम भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलं होतं. पोखरणमध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली. ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी हे वाक्य म्हणत जगाला भारत अणुशक्तीकडे वाटचाल करू लागला आहे, हे सांगितले. इतकंच नाही तर भाजप सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही भारताने दुसर्यांदा यशस्वी अणुचाचणी केल्याबद्दल …आणि बुद्ध हसला! हेच विधान केलं होतं. गौतम बुद्ध अणुचाचणीसारख्या प्रयोगावर हसतो, यावर तेव्हाही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण बुद्ध अहिंसा आणि शांती सांगतो.
आज पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जग तिसर्या महायुद्धाच्या तोंडावर आहे, असं जाणकारांचं मत आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाकडे पाहिल्यावर जाणकारांच्या मतावर विश्वास ठेवावासा वाटतो.
आज हे सारं अचानकच आठवण्याचं काहीच कारण नाहीय. उलट आज बुद्ध आणि त्यांचे विचार आठवणे ही काळाची गरज आहे. मात्र, ही गरज केवळ भारताला नाही तर अखंड जगाला आहे. नुकतंच पाकिस्तानची सर्वात कमी वयाची समाजसेविका आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई हिची संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिओ गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. दरम्यान, 19 वर्षीय मलाला युसुफझाईला सर्वात कमी वयाची शांतिदूत होण्याचा मान मिळाला आहे. मलालाविषयी नव्याने सांगण्याची काहीच गरज नाहीय, तरीही अशा प्रसंगी इतिहासाचे स्मरण करणे अनिवार्य आहे. सन 2012मध्ये पाकिस्तानात शिक्षणाचा प्रसार केल्यामुळे मलाला युसुफझाईला तालिबानी दहशतवाद्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानात शिक्षणाचा प्रसार थांबवा, असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते. मात्र, मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. मलालाच्या याच कार्याची दखल घेत तिला हा सन्मान देण्यात आला आहे. मलालाच्या या कामगिरीचे पाकिस्तानात किती मोल असले? या प्रश्नाचं उत्तर दोन टप्प्यांत देता येईल. पहिले म्हणजे, पाकिस्तानमधील आम जनतेला मलालाविषयी प्रचंड आदर आहे. ते तिला रोल मॉडेल मानतात. तिच्या कार्यासाठी तिथली जनता कायमच गर्व बाळगून आहे, तर दुसरा टप्पा म्हणजे, पाकिस्तानमधील कट्टरतावादी गट आणि तिथलं सरकार. या दोन्ही पातळ्यांवर मलालाला अद्यापही संघर्ष करावा लागतो आहे. तिथल्या मुलींना आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून ही मुलगी गेल्या काही वर्षांपासून जीवाचं रान करते आहे. एखाद्या लहानगीकडून इतकं मोठं कार्य होत असतानाही पाकिस्तान सरकार तिथल्या कट्टरतावाद्यांना रोखू शकत नाही. यातूनच पाकिस्तान सरकारची मनोभूमिकाही स्पष्ट होते.
ही झाली पाकिस्तानची अंतर्गत बाब. मात्र, पाकिस्तान भारताच्या सीमारेषांवर दररोज जो धुमाकूळ घालत आहे. सतत घुसखोरी करून भारतीय लष्करावर हल्ले करणे, भारतीय जवानांना नाहक जीवे मारणे, काश्मीर खोरं कायम धगधगत ठेवणे, अशा अनेक कारवाया पाकिस्तान गेले अनेक दशकं करत आहे. मात्र, आता यावर थेट संयुक्त राष्ट्रसंघानेच उत्तर दिलं आहे. मलाला युसुफझाई हिलाच संघाने शांतिदूत बनवून तिचा जागतिक सन्मान केला आहे. तिच्या या सन्मानाने पाकिस्तानची छाती अभिमानाने फुलली असेल का? हा खरा प्रश्न आहे. कारण आशिया खंडातील सर्वच सीमा रेषा सतत धुमसत ठेवण्यात पाकिस्तानचा हात कुणीच धरू शकत नाही तसेच जागतिक पातळीवरील सर्वच बड्या दहशतवाद्यांशी पाकिस्तानचे संबंध असल्याचं नेहमीच उघडकीस येत जाते. या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांच्या देशातील एका मुलीने शांतिदूताचा सन्मान मिळवून खरेतर पाकिस्तानला जागतिक पातळीवर स्वत:ची छबी सुधारण्याची एक बडी संधी मिळवून दिली आहे. या संधीचं पाकिस्तान सोनं करतं की माती, ते आता येणारा काळ ठरवणार आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानने आता हेही स्पष्ट करायला हवं की, खरंच त्यांना युद्ध नको बुद्ध हवाय!
-राकेश शिर्के
9867456984