खराब रस्ते, अपूर्ण गटारींवरुन ‘बांधकाम’च्या अभियंत्यांना आयुक्तांनी धरले धारेवर

0

महापालिकेची स्थायी सभा ; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर काम करायचे का? या तीव्र शब्दात अधिकार्‍यांना खडसावले ; आता आयुक्तच करणार स्वतः कामांची पाहणी

जळगाव – शहरात विविध खराब रस्ते, अपूर्ण अवस्थेत गटारींचे बांधकाम रस्त्याच्या बाजूला पडलेले बांधकाम साहित्य अशा एक ना अनेक समस्या रस्त्यावरून जातांना महापालिकेतील अधिकार्‍यांना दिसतात, पण या समस्या सोडविण्याची जबाबदारी का अधिकारी घेत नाही. नगरसेवक तक्रारी करतात तेव्हाच काम करायचे का ? अशी नाराजी व्यक्त करत, आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. कामांच्या गुणवत्तेवरच प्रश्‍न उपस्थित असल्याने आता मी स्वतः पाहणी करणार असणार असून सबंधित मक्तेदारांची बैठक घेण्याची तंबीही यावेळी आयुक्तांनी अधिकारी, अभियंत्यांना दिली.

स्थायी समितीची आज सभा स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, मुख्य लेखाअधिकारी संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेत शिवसेनेचे सदस्य विष्णू भंगाळे व नितीन लढ्ढा यांनी शाहूनगर रस्त्याची दयनीय अवस्थेची समस्या मांडली. तसेच बजरंग बोगदा येथील देखील रस्त्याच्या बाजूला साईडपट्यावरील गवत, मातीचे ढिग अशा लहान समस्या देखील बांधकाम विभागाकडून सोडविल्या जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावेळी आयुक्तांनी बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत तातडीने या समस्या सोडविण्यासाठी सुचना दिल्या. तसेच आयत्या वेळच्या आलेल्या विषयांमध्ये दैनिक बाजार वसुलीचा मक्ता देण्याचा विषय आला. त्यानुसार मक्तेदाराचा 1 कोटी 54 लाखाचा मक्त्याला मंजूरी देण्यात आली.

नवीन बांधलेल्या गटारींच्या कामांवर प्रश्‍नचिन्ह
शिवसेना सदस्य, नितीन बरडे व लढ्ढा यांनी शहरातील होणार्‍या कामांच्या गुणवत्तावर प्रश्‍न उपस्थित केला होता. यात सर्वात जास्त नविन बांधल्या जात असलेल्या गटारींचे कामे व्यवस्थित होत नसून त्यांना उतार दिला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात समस्या असल्याचे सांगितले. यावर आयुक्त म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात निधी येत असून त्या कामांची गुणवत्ता असायला हवी. याची प्रथम जबादारी प्रभागातील अभियंता त्यानंतर बांधकाम अभियंत्याची आहे. मी स्वःता या कामांची पाहणी करणार असून सर्व मक्तेदारांच्या कामांची माहिती घेवून त्यांची बैठक घेण्याच्या सुचना शहर अभियंत्यांना आयुक्तांनी दिल्या.

गाळे हस्तांतरणावर प्रशासाने विचार करावा
महापालिकेच्या मालकीचे अनेक व्यापारी संकुलाची मुदत अजून बाकी असून मुळ गाळेधाकरांनी गाळे विकण्याचे व्यवहार केले. याबाबत गाळे हस्तांतरण प्रक्रियेतून महापालिका उत्पन्न मिळणार होते त्यानुसार ठराव देखील केला होता. परंतू महापालिकेने राज्य शासनाने हा ठराव विखंडणासाठी पाठविला. मुळात 5 ते 6 कोटी उत्पन्न यातून मिळणार आहे. तसेच जाहिरात कर मक्ता गेल्या सहा वर्षापासून दिला गेल्याने सहा वर्षात महापालिकेचे 1 कोटी 41 लाख 30 हजाराचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. यावर प्रशासाने विचार करावा असे लढ्ढा यांनी सुचना मांडल्या.

गुणवत्तेसाठी अभियंत्यांची समिती गठित करा
शहरात मोठ्या प्रमाणात निधी येत असून या कामांची गुणवत्ता टिकवीण्याठी चांगल्या अभियंत्यांची एक समिती तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे खर्च केलेल्या निधीतून 10 ते 15 वर्ष हे कामे टिकली पाहिजे. कामे खराब झाली तर नागरिक नगरसेवकांना जबाबदार धरतात. त्यामुळे अशा कामांसाठी अभियंत्यांची समिती गठित करा अशी मागणी सदस्य लढ्ढा यांनी केली.

कंत्राटी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत समाजीक विकास तज्ञ या पदासाठी झालेल्या भरती प्रक्रिया झाली. परंतू या भरतीत या पूर्वी हे काम करणार्‍यांचा या पदासाठी विचार न करता अन्य कोणाची भरती झालेली आहे. यात कुठेतरी गैरव्यव्हार झाल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. यावेळी आयुक्त म्हणाले, की मुलाखती योग्य पद्धतीने घेवून योग्य उमेदवार निवडला गेला आहे. यात कुठला ही गैरव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट केले.