खरेदीनंतर फसवणूक झाल्यास तक्रार करा

0
तहसीलदार विजयकुमार ढगे यांचे आवाहन ; रावेरला ग्राहक दिन 
रावेर:– जनतेने कोणत्याही वस्तुची खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे, कुठल्याही वस्तुमध्ये तफावत आढळल्यास मला किंवा वैध मापन व अन्न प्रशासनालाही थेट कळवण्याचे आवाहन तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी येथे केले. जागतिक ग्राहक दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात ग्राहकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते
यांची होती उपस्थिती
जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, प्रशांत बोरकर, दिलीप कांबळे, अ‍ॅड.एम.ए.खान, अ‍ॅड.धनराज पाटील, डॉ.गुलाबराव पाटील, प्रेमचंद गांधी, नायब तहसीलदार सी.एच.पाटील, पुरवठा अधिकारी शैलेश तरसोदे, अव्वल कारकुन शेखर तडवी, विठ्ठल पाटील, मोहन महाजन, काशीनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
वैध मापन व अन्न प्रशासन विभागाबद्दल संताप
जागतिक ग्राहक दिन असतानाही दरवर्षी तहसीलदारच पुढाकार घेऊन हा दिवस साजरा करतात परंतु व्यापार्‍यांकडून खरी मलाई खाणारा वैध मापन विभाग येथे होर्ग्डिंग्ज लावून तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्यात धन्तय मानत असल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. ग्राहकांना मार्गदर्शना बाबत त्यानां कुठलेही देणे-घेणे नाही तर अन्न प्रशासन विभागाचे अधिकारीदेखील दरवर्षी ग्राहकांच्या कार्यक्रमाला दांड्या मारत असल्याने दोन्ही विभागा बद्दल उपस्थित ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार
गत दोन-तीन महिन्यांपासून रावेर शहरात भेसळी  संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाया केल्या  आहेत तर वैध मापन विभागाने पेट्रोल पंप, लो-प्राईज सारख्या मोठ्या ठिकाणी मापात पाप केले म्हणून कारवाई केली होती. गुरुवारी जागतिक ग्राहक दिनाला मोठ्या प्रमाणात जनतेची हजेरी असतांना दोन्ही विभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. काहींनी या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.