खर्च पालिकेचा, चमकोगिरी भाजप नेत्यांची तर विरोधकांना डावलले

0

विरोधकांनी केला सत्ताधार्‍यांचा निषेध

पिंपरी : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 311 दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या चांगल्या कार्यक्रमात सत्ताधारी भाजपने घाणेरडे राजकारण केले आहे. या कार्यक्रमासाठी पिंपरी महापालिकेने पाच लाख रुपये दिले आहेत. असे असताना विरोधी पक्षनेते, गटनेते यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकले नाही. स्थानिक नगरसेविकेचे देखील पत्रिकेत नाव टाकले नाही. तसेच पुण्याच्या खासदाराचे, मावळच्या आमदाराचे संबंध नसताना नाव टाकले आहे. परंतु, बारामती मतदार संघात पालिका हद्दीतील ताथवडे परिसर येतो. या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील नाव पत्रिकेत टाकले नाही. भाजपच्या नेत्यांनी पालिकेच्या पैशांवर चमकोगिरी केली असल्याचा आरोप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेने केला आहे. तसेच भाजपच्या या घाणेरड्या राजकारणाचा विरोधकांनी निषेध केला.

विरोधी पक्षनेतेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, अपर्णा डोके आदी उपस्थित होते.

नावे न टाकण्याचे राजकारण
दत्ता साने म्हणाले की, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहकार मंत्रालयाच्या सहयोगाने आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 311 दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महापालिकेच्या वतीने कल्याणकारी योजने अंतर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग अर्थ सहाय अर्ज वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. असे असताना या कार्यक्रमाचे विरोधकांना निमंत्रण दिले नाही. निमंत्रण पत्रिकेत नावे टाकण्यावरुन राजकारण केले आहे. तर, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्षेत्रात पालिका हद्दीतील ताथवडे हा भाग येतो. तरी, देखील त्यांचे नाव निमंत्रपत्रिकेत टाकले नाही.

भाजपची स्वत:ची चमकोगिरी
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, सत्ताधारी भाजपचा हा रडीचा डाव आहे. करदात्यांच्या पैशांवर स्वत:ची चमकोगिरी करुन घेतात. या कार्यक्रमाला पालिकेने आर्थिक
मदत केली असताना पालिकेतील विरोधी पक्षनेता, गटनेत्यांची नावे टाकणे गरजेचे होते. परंतु, भाजपने यामध्ये कोतेपणाचे राजकारण केले आहे.

गटनेत्यांना निमंत्रण नाही
मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले की, या कार्यक्रमाची गटनेत्यांना निमंत्रण पत्रिका देखील नाही. सकाळी उशिरा फोन करण्यात आला. साहित्य वाटण्याचा कार्यक्रम सत्ताधारी भाजपच्या नव्हे तर शहरातील करत्यांच्या पैशातून करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या पत्रिकेवर सर्व पक्षाच्या गटनेत्यांचे नाव टाकणे अनिवार्य होते. गटनेत्यांना मानसन्मान देणे गरजेचे होते. दरम्यान, याबाबत पालिकेतील पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.