औषध बनवण्यासाठी उपयोग
पुणे : दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची तस्करी करणार्या तीन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक खवले मांजर जप्त करण्यात आले. योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे, अरुण कुसाळकर अशी या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागात चार ते पाच जण दुर्मिळ वन्यजीव असलेले खवले मांजर विक्री करता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या कारची तपासणी केली असता कारच्या डीक्कीमध्ये एका पोत्यात हा प्राणी आढळून आला.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे खवले मांजर विक्री करण्याकरता आणले असल्याचे त्यांनी सांगितले. या मांजराची किंमत 70 लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. या मांजराचे वजन नऊ किलो 200 ग्रॅम असून शेपटीपर्यंत त्याची लांबी 128 सेंटीमीटर आहे. पोलिसांनी हे खवले मांजर वनाधिकार्यांच्या ताब्यात दिले असून या आरोपीने अजून कुठे अशा प्रकारची खवले मांजर विक्री केले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात हे कोणाला विकणार होते याचाही तपास सुरू आहे. खवले मांजराला परदेशात मागणी आहे. औषध बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो असे सांगितले जाते.