नंदुरबार (रवींद्र चव्हाण)। शासनाने शिक्षणहक्क कायदा लागू केला असला तरी या कायद्याची नंदुरबार जिल्ह्यात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतेक शिक्षण संस्थामध्ये नर्सरी पासून ते अकरावी प्रवेशासाठी डोनेशन घेतले जात असल्याने सर्वसामान्य पालकवर्ग कमालीचा वैतागला आहे. याकडे शिक्षण विभागापासून तर सर्वच सामाजिक संघटनांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो आहे. शहरातील शाळा महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया झाली असून काही महाविद्यालयात अजून सुरू आहे. यावर्षी अकरावीच्या 70 टक्के विद्यार्थ्यांनी सायन्सला प्रवेश घेतला आहे. त्यामुळे याशाखेचे वर्गफुल्ल झाले असून अतिरिक्त विद्यार्थ्यांचा भरणा झालेला आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना 10 ते 12 हजार रुपये मोजावे लागले आहेत. म्हणजेच डोनेशन भरून प्रवेश घ्यावा लागला आहे.
विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल
सगळेच विद्यार्थी सायन्सवर तुटून पडल्याने आर्टशाखेच्या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे.विज्ञान या विषयाला प्रतिष्ठा असल्याची भाबडी आशा पालक व विद्यार्थ्यांची बनली आहे.यामुळे कला या विषयाला घरघर लागली असून हे विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डोनेशन हा प्रश्न केवळ महाविद्यालयापुरता नसून नर्सरी पासून पहिली व त्यापुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रकियेत देखील आहे.नर्सरीला प्रवेश घेण्यासाठी तीन ते साडेतीन हजार तर पाहिलीसाठी नवीन प्रवेश घायचा असल्यास 10 हजार रुपये मोजावे लागतात.ही वस्तुस्थिती आहे.शहरातील अनेक नामवंत शाळांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू असून याचा अनुभव विद्यार्थ्यांच्या पालकांना येतो आहे. याबाबत काही जागरूक पालकांनी शिक्षण विभागाकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या असल्या तरी त्याकडे शिक्षणाधिकार्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे .