खाजेची पावडर टाकून चोरांनी केली चोरी

0

हिंगोली – शहरात नेहमीच चोरीच्या घटना घडत असतात. अशीच अजून एक घटना समोर आली आहे. शहरातील व्यापारी रवी सोनी यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हातातील पैसे असलेली बॅग फिल्मी स्टाईलने पळवून नेली. पेपर मार्टचे व्यापारी रवी सोनी हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी जात असताना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

रस्त्यात मित्र भेटल्याने रवी सोनी हे बोलत उभे होते. ते बोलून निघणार तेवढ्यातच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोनी यांच्या अंगावर खाजेची पावडर टाकत, हातातील बॅग हिसकावून वेगाने पळून गेले. सोनी यांच्या मित्राने त्या दुचाकी स्वारांचा पाठलाग केला मात्र, ते अंधाराचा फायदा घेत वेगाने निघून गेले.

हा सर्व प्रकार पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरातील गांधी चौक व इतर ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.