पुणे । पुणे-मुंबई दरम्यान धावणार्या डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील ‘खानपान’ सेवा अखेर खासगी कंत्राटदाराच्या हाती सोपविण्यात आली आहे. डेक्कन क्वीनसह देशभरातील आणखी काही गाड्यांच्या ‘खानपान’ सेवेचे खासगीकरण करण्यात आले असून, याबाबतच्या टेंडरमध्ये कंत्राटदारांना ‘पँट्रीकार’ चालविण्यासाठी दिली जाणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार हद्दपार होऊन पँट्रीकार लावण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पुण्याच्या डेक्कन क्वीनची निविदा दिल्लीत कशी काय निघू शकते? यामागे मोठे राजकारण असून रेल्वे आणि खासगी कंत्राटदाराचे साटेलोटे आहे, असा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी केला आहे.
व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस कंपनी
डेक्कन क्वीनसह हावडा-यशवंतपूर एक्स्प्रेस, निजामुद्दीन गरीब रथ, चेन्नई एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या गाड्यांमधील ‘खानपान’ सेवा कंत्राटदारांमार्फत चालविण्याविषयीची मर्यादित निविदा 28 सप्टेंबर रोजी काढण्यात आली होती. त्यानुसार डेक्कन क्वीनची ही सेवा व्हरायटी पॅन्ट्री सर्व्हिसेस या कंपनीला 16 लाख 51 हजार रुपयांच्या मोबदल्यात दिली आहे. दरम्यान, डायनिंग कारमधील या सेवेचे खासगीकरण झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र, बुधवारी नेहमीप्रमाणेच ‘डायनिंग कार’ उपलब्ध होती. या डायनिंग कारच्या जागी पुन्हा एकदा पँट्रीकार जोडली जाण्याची शक्यता आहे. तसेच, रेल्वे बोर्डाचे कर्मचारी देखील बदलण्यात येणार असून, खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.
हॉटेलप्रमाणे किचन व हॉटेलप्रमाणे किचन
डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार सुविधा ही भारतातील अन्य कोणत्याही गाडीमध्ये उपलब्ध नाही. हॉटेलप्रमाणे किचन आणि त्याच ठिकाणी ग्राहकांना बसून खाण्याची सोय आहे. या डायनिंगकारमध्ये 32 टेबल-खुर्च्या आहेत. पुणे-मुंबई प्रवासामध्ये कित्येक प्रवासी डायनिंग कारमध्ये बसावयास जागा मिळावी, यासाठी नंबर लावून ताटकळत उभे राहतात.
गेल्या मंगळवारी (दि.31) मध्यरात्रीपासून डेक्कन क्वीनच्या ‘खानपान’ सेवेचा ताबा खासगी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आला. त्यामुळे या सेवेमध्ये कर्मचारी देखील त्याच कंत्राटदाराचे असणे अपेक्षित होते. मात्र, ते कर्मचारी आयआरसीटीसीद्वारे अन्य गाड्यांना सेवा देणारे कर्मचारीच आहेत. या सर्व कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. मात्र, तीही केलेली नसल्याचा आरोप हर्षा शहा यांनी केला आहे.