असलोदला ग्रामसेवकासह पानटपरी चालकास तर धुळ्यात सर्वेअर जाळ्यात
धुळे/नंदुरबार- खान्देशातील दोन लाचखोरांवर शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या कारवाईत धुळे वनविभागातील सर्वेअर मनोहर बाबूलाल जाधव यास 15 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली तर दुसरी कारवाई शहादा तालुक्यातील असलोदमध्ये झाली. ग्रामसेवकासह पानटपरी चालकास 30 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.
धुळ्यातील लाचखोर सर्वेअर जाळ्यात
धुळे- गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागात घाटबारी पाझर तलावाच्या बांधाखाली सिंचन विहिर खोदण्यासाठी साक्री तालुक्यातील खुडाणे गावाच्या 30 वर्षीय तक्रारदाराने वनविभागाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी देण्यासाठी संशयीत आरोपी तथा धुळे वनविभाग उप वनसंरक्षक विभागाचा सर्वेअर मनोहर बाबूलाल जाधव (36) याने 26 नोव्हेंबर 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने 15 हजार रुपये देण्याचे सांगून धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शीवतीर्थाजवळील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातच आरोपीच्या लाच घेताना मुसक्या आवळण्यात आल्या
यांच्या पथकाने केली कारवाई
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश देसले, पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्यासह पथकातील हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडिले, सुधीर सोनवणे, संदीप सरग, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, सतीश जावरे, भूषण खलाणेकर, शरद काटके, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने केली.
असलोदमध्ये ग्रामसेवकासह पानटपरीचालक जाळ्यात
नंदुरबार- असलोद गावात दलित वस्ती योजनेंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम केले होते मात्र या कामापोटी ग्रामपंचायतीकडून बिल घेणे बाकी असल्याने ही रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यासाठी ग्रामसेवक महेश विनायक पाटील (42, असलोद, डोंगरगाव) यांनी एकूण रकमेच्या 10 टक्केप्रमाणे 30 हजार 500 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे नोंदवली. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आरोपी ग्रामसेवकाने लाचेची रक्कम पानटपरी चालक संदीप गोविंद मराठे (36, रा.नितीन नगर, प्लॉट नं. 14, शहादा) याच्याकडे देण्यास सांगितल्यानंतर लाच स्वीकारताच पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे यांच्यासह उत्तम महाजन, दीपक चित्ते, संदीप नावाडेकर, ज्योती पाटील आदींच्या पथकाने केली.