खान्देशातील नव्हे तर राज्यासह देशातील बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात

0

राष्ट्रीय सरचिटणीस चेल्लर वामसीचंद रेड्डी यांचा दावा ; रावेर, जळगावबाबत उमेदवार निश्‍चिती नाही

भुसावळ- भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस चेल्लर वामसीचंद रेड्डी यांनी खान्देशातील नव्हे तर राज्य व देश पातळीवरील भाजपाचे बडे नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छूक असल्याचा दावा करीत योग्य वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानांतर्गत भुसावळसह रावेर व यावल तालुक्यात पदाधिकार्‍यांचा मंगळवारी मेळावा घेण्यात आला. प्रसंगी रेड्डी हे भुसावळात आल्यानंतर त्यांच्याशी ‘दैनिक जनशक्ती’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.

भाजपाचे बडे पदाधिकारी काँग्रेसमध्ये येणार
पाच राज्यातील निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून खान्देशातील भाजपामधील अनेक नाराज पदाधिकारी काँगे्रसमध्ये येत असल्याबाबत रेड्डी यांना छेडले असता त्यांनी स्मितहास्य करीत खान्देशातील नव्हे तर राज्यासह देशातील अनेक बडे पदाधिकारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याचे ते म्हणाले. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा असून त्याबाबत काय सांगाल? असा विचारले असता रेड्डी यांनी आता कुणाचेही नाव सांगणे योग्य होणार नाही, असे सांगत योग्य वेळ आल्यावर पक्ष पदाधिकार्‍यांची नावदेखील जाहीर करणार असल्याचे सांगून याबाबत सस्पेन्स कायम ठेवला.

रावेरची जागा काँग्रेससाठी मागणार
रावेरसह जळगाव लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रणकंदन सुरू आहे तर रावेरची जागा काँग्रेसला मागणार का ? या विषयावर रेड्डी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसची या मतदारसंघात ताकद असल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली आहे. पक्ष प्रमुखांकडे आपण त्याबाबत तसा अहवाल देणार असून त्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी सांगत उमेदवारांची अद्याप निश्‍चिती झाली नसल्याचेही सांगितले.

भुसावळातील मेळाव्यात भरला जोश
भुसावळ- शहरातील रंगभवनात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या मेळाव्यात काँग्रेसमध्ये अनेकांनी प्रवेश केला तर रेड्डी यांनी भाजपा सरकारवर टिकेची झोड उठवत आगामी निवडणुकांमध्ये सत्ता आपलीच असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. प्रसंगी प्रभारी निरीक्षक डॉ.हेमलता पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, डी.जी.पाटील, अ‍ॅड.ललिता पाटील उपस्थित होते. शहराध्यक्ष रवींद्र निकम, रहिम कुरेशी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.

जनतेने निवडून दिल्यास शिरीष चौधरींना मंत्री करणार
रावेर- 2019 च्या विधानसभेत राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यास व रावेर विधानसभेतून शिरीष चौधरी निवडून आल्यास चौफेर विकासासाठी त्यांना आघाडी सरकार ध्ये मंत्रीपद देणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस बी.जे.पाटील यांनी येथील मेळाव्यात दिले. कृषी उपन्न बाजार समितीच्या आवारात काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानांतर्गत मेळावा झाला. याप्रसंगी पाटील बोलत होते. प्रसंगी रेड्डी यांनी काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
जन जनसंपर्क अभियानासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप भैय्या पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस बी.जे.पाटील, काँग्रेस जळगाव प्रभारी डॉ.हेमलता पाटील, मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा परीषद सदस्य सुरेखा पाटील, बाजार समिती सभापती राजीव पाटील, पंचायत सदस्य प्रतिभा बोरोले, माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी, नरेंद्र पाटील, सुलोचना पाटील आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.

भूमिका स्पष्ट भाजपातच राहणार -नाथाभाऊ
आपली भूमिका यापूर्वीच आपण स्पष्ट केली असून भाजपा सोडण्याचा आपला कोणताही विचार नाही, असे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.