खान्देश कन्येचे नाव विद्यापीठाला देणे अभिमानाचे

0

* कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांचे  प्रतिपादन

जळगाव । आज शनिवार 11 ऑगस्टपासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा झाला असल्याची घोषणा कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शनिवार विद्यापीठात झालेल्या बौठकीत केली. शुक्रवारी नामविस्ताराबाबतचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यामध्ये 11 ऑगस्ट पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार होत असल्याचे सुचित करण्यात आले. त्या अनुषंगाने शनिवारी सिनेट सभागृहात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नामविस्ताराचा आनंदोत्सव होणार साजरा
यावेळी बोलताना कुलगुरुंनी आजपासून विद्यापीठाचा नामविस्तार होत असल्याचे जाहीर केले. हा दिवस विद्यापीठाच्या दृष्टीकोनातून अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे कारण खानदेशातील एका शेतकर्‍याच्या कुटुंबात जन्मलेल्या आणि अक्षर ओळख नसलेल्या बहिणाबाईंचे नाव उच्च शिक्षण देणार्‍या विद्यापीठाला दिले जात आहे यासारखी अभूतपूर्व घटना कोणतीच असू शकत नाही अशी भावना व्यक्त करुन कुलगुरुंनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानलेे. या नावाला अधिक उंची आणि मोठेपण प्राप्त होईल या प्रकारची कृती विद्यापीठाशी निगडीत सर्व घटकांनी करावी अशी अपेक्षाही त्यांनी या बौठकीत व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच नामविस्तार आनंदोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रारंभी कुलसचिव भ.भा.पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील उपस्थित होते. या बौठकीला विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील यांनी केले.