खान्देश नाट्य महोत्सवात लोकगीतांनी जनजागृती

0

नाट्य महोत्सवाला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; नाट्य रसिकांना उपस्थितीचे आवाहन

भुसावळ- उत्कर्ष कलाविष्कार भुसावळ आयोजित स्व. देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाला शुक्रवारपासून नाहाटा महाविद्यालयात सुरूवात झाली. नागपूर येथील नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून, तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन झाले तर डॉ. आशुतोष केळकर यांच्या हार्मोनिका वादनाने या शानदार नाट्य महोत्सवाची सुरूवात झाली. दरम्यान, महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी सायंकाळी उत्कर्ष कलाविष्कार निर्मित ‘लोकगीतांचा जागर’ या कार्यक्रमात भारूडे व वाघ्या मुरळीचे गीते सादर करून जनजागृती करण्यात आली.

‘लोकोमोशन’ नाटकालाही रसिकांची दाद
महोत्सवात शनिवारी सायंकाळी ‘लोकगीतांचा जागर’ हा कार्यक्रम धनश्री जोशी, कुंदन तावडे, दर्शन गुजराथी, स्वप्नील नन्नवरे, उमेश गोरधे आदी सहकार्‍यांनी सादर केला तर सायंकाळी सात वाजता मिती- चार कल्याण प्रस्तुत ‘लोकोमोशन’ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांनी रसिकांनी नाटकाला दाद दिली. रविवारी जळगाव येथील भूमी बहुउद्देशीय संस्था निर्मित विनोदी एकांकीका ‘मिस्टर विसरभोळे’ सादर होईल. लेखक वैभव मावळे आहेत. त्यानंतर 7.30 वाजता पार्थ थिएटर, मुंबईनिर्मित पु.ल. देशपांडे यांच्या कादंबरीवर आधारीत मुकेश माचकर लिखित व मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘मराठी वाड़मयाचा गाळीव इतिहास’ हा धमाल विनोद दीर्घाअंक सादर होईल.

उद्घाटनास यांची होती उपस्थिती
महोत्सवाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष तथा ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक उद्घाटनन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. उद्घाटन समारंभानंतर ‘किमया’ या नाटकाचे अभिवाचन झाले. माधव आचवल लिखित किमया नाटकाचे अतुल पेठे यांनी अभिवाचन केले. आमदार संजय सावकारे, ताप्ती ऐज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, डॉ. आशुतोश केळकर, सोनू मांडे, दिलीप वामन पाटील, नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी वायकोळे, डॉ. जतीन मेढे, रघूनाथ सोनवणे यांच्यासह नाट्यप्रेमी उपस्थित होते.

नाट्य जंक्शन होत आहे शहर -प्रेमानंद गजी
भुसावळ ज्या प्रमाणे रेल्वेचे जंक्शन आहे तसेच ते आता नाटकाचे सुध्दा जंक्शन होत असल्याचे प्रेमानंद गजभी म्हणाले. कलावंतांनी धडपडल्याशिवाय त्यांच्या हाती काहीही लागत नाही. त्यासाठी कलेवर प्रेम करण्याची गरज आहे. कलेवर प्रेम करा, मुख्य पाच कला असून त्यात स्थापत्य कला, शिल्प कला, नृत्य कला, संगीत कला, चित्र कला आणि कविता, कथा, कादंबरी ही सुध्दा एक सहावी कलाच असल्याचे त्यांनी सांगितले.

नाट्य संस्कृती जीवंत ठेवली -आमदार
उत्कर्ष कलाविष्कारने शहरातील नाट्य संस्कृती जीवंत करण्याचे काम केले आहे. आज आधुनिकतेच्या काळात नाटकांकडे कमी प्रेक्षक वळतात मात्र भुसावळात आजही नाट्य कला जीवंत ठेवल्याचे श्रेय उत्कर्ष कलाविष्कारला देणे गरजेचे असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. दरम्यान, प्रायोगीक ना्ट्य चळवळ जीवंत ठेवण्याचे काम उत्कर्षने केले आहे. एकीकडे नाटकांचे प्रेक्षक कमी होत आहे तर दुसरीकडे शहरातील नाट्य संस्कृती आजही पूर्वीसारखीच ठेवली जात आहे. उत्कर्षच्या सर्व सहकार्‍यांचे यात मोलाचे योगदान असल्याचे महोत्सवाचे अध्यक्ष मोहन फालक म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक अनिल कोष्टी यांनी केले.