खान्देश भूमिपूत्राची अटांर्टिकात मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके

0
राहुल सनेरांनी साता समुद्रापार पोहोचवला मल्लखांब
वरणगाव- शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. याच शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या राहुल सनेर या सीमा सडक संघटनमधील जवानाने नुकतेच अटांर्टिकात उणे 15 ते 50 तापमानात दोराच्या सहाय्याने मल्लखांबचे सादरीकरण केले, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच व्यक्ती ठरला आहे.
जिद्द व परीश्रमाने गाठले यश
हातेड (ता.चोपडा) येथील रहिवासी असलेले शालिग्राम सनेर हे वरणगाव आयुध निर्माणीतील नूतन मराठा विद्यालयात शिक्षक होते. त्यांचे सुपुत्र राहुल यांनी लहानपणापासूनच इतरांपेक्षा काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न  केला. यातूनच ते मल्लखांबाकडे वळले. पहिली ते चौथी आयुध निर्माणी शाळा व महात्मा गांधी विद्यालयात पुढील शिक्षण घेताना क्रीडा शिक्षक जयंत जोशी, रुपा कुळकर्णी, आशिष चौधरी, लक्ष्मीकांत नेमाडे यांनी राहुलमधील मल्लखांबाविषयीचे आकर्षण, लवचिकता, चपळता पाहून त्याला मार्गदर्शन केले. यामुळे राहुलने मल्लखांबच्या शालेय, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या. सन 2003 मध्ये दहावीनंतर त्याने आयटीआय, अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. जळगाव आगारात अ‍ॅप्रेंटिसीप केली. यानंतर त्याची सीमा सडक संघटनमध्ये निवड होऊन अरुणाचल प्रदेशात पोस्टींग झाली. राहुलने येथे लाकडापासून स्वत: मल्लखांब तयार करून घेत सराव सुरू ठेवला. इतरांनादेखील प्रशिक्षण दिले मात्र, जगावेगळे काहीतरी करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसल्याने राहुलने अटांर्टिकात पोस्टींगसाठी नॅशनल सेंटर अ‍ॅन्थर ओशन रिसर्च (एनसीएओआर) या संस्थेची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होताच अटांर्टिकात पोस्टिंग झाल्यावर राहुलने वरीष्ठांकडे उणे 15 ते 50 अंश तापमानात मल्लखांबाच्या कसरती दाखवण्याची इच्छा प्रकट केली. त्यात तो यशस्वी ठरला.
आधी नकार, नंतर परवानगी
अटांर्टिकासारख्या बर्फाळ प्रदेश व उणे तापमानात मल्लखांब सादरीकरणाची परवानगी मिळाली मात्र एव्हढ्या लांबच्या प्रवासात मल्लखांब नेणार कसा? असा प्रश्न राहुलसमोर होता. त्यामुळे त्याने लाकडाऐवजी रोप मल्लखांबला प्राधान्य दिले मात्र उणे 15 ते 50 तापमानात रोप मल्लखांबमुळे शरीराला इजा होऊ शकते या कारणावरून अधिकारी परवानगी देण्यास तयार नव्हते मात्र राहुलचा निश्चय पाहून त्यांनी परवानगी दिली.
अधिकारी अचंबित
अधिकार्‍यांनी परवानगी देऊनही मल्लखांबसाठी रोप (दोर) बांधणार कशाला? हा प्रश्न कायम होता. यासाठी खास क्रेन मागवण्यात आले. या क्रेनच्या वरील टोकाला दोर बांधून राहुलने मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती दाखवल्या. यावेळी राहुलची लवचिकता, चपळता पाहून अधिकारीदेखील अचंबित झाले.