खान्देश सेंट्रलच्या जागेवर वाहनतळ

0

जळगाव । रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महानगरपालिकेतर्फे बॅरीगेटस टाकले जाणार आहेत. रेल्वेस्थानकावर वाहने नेण्याच्या मुख्य रस्त्यांवरच बॅरीगेटींग करण्यात येणार असल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानक व दादर्‍यापर्यंत वाहन नेणे अवघड बनणार आहे. यामुळे संरक्षक भिंत तोडून तयार केलेल्या पर्यायी रस्त्यांकडून खान्देश सेंट्रलच्या जागेत वाहने लावावी असा निर्णय जिल्हाधिकारी व महापौरांनी आज भेट दिल्यानंतर घेतला. रेल्वेस्थानकावर जातांना नेहरु चौकातून जाणार्‍या रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडत होता. हा ताण कमी करण्यासाठी खान्देश सेंट्रलमधून पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. याप्रस्तवानुसार खासदार ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेवून रेल्वे स्थानकाची संरक्षक भिंत तोडून तात्काळ तोडून खान्देश सेंट्रलकडून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. परंतु, रेल्वे प्रशासनाने या रस्त्यावर पुन्हा बॅरीगेटस बसविल्याने रेल्वेस्थानकाच्या भिंतीपर्यंतच वाहने नेता येत आहेत. यातून भिंत तोडून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्त्याचा उपयोग होतांना दिसत नाही.

रस्त्यांची केली पाहणी
पर्यायी रस्त्यांवर बॅरीगेटींग केल्याने नेहरु चौकातून जाणार्‍या रस्त्याने रेल्वेस्थानकापर्यंत व दादर्‍यापर्यंत पुर्वीसारखी वाहने नेली जात आहेत. यातून वाहतुकीची कोंडी होणे नित्याची बाब झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व महापौर नितिन लढ्ढा यांनी पुन्हा गुरूवारी रेल्वे स्थानकावर जावून रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रेल्वेस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बॅरीगेटस बसवून वाहतुकीस बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी शहर अभियंता सुनील भोळे यांना दिल्यात. यामुळे स्थानकापर्यंत वाहने जाणार नाहीत. आता पर्यायी रस्त्यावरुन वाहने नेवून ती खान्देश सेन्ट्रलच्या जागेत पार्कींग करावी लागणार आहेत. याठिकाणी पार्कींग करण्याचा विचार असल्याची माहीती महापौरांनी दिली.

मेहरुण तलावाभोवती डांबरी रस्ते
महापालिकेला रस्ते विकासासाठी पावणेचार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. अमृतची कामे सुरु होत असल्याने नविन रस्त्यांची कामे करु नये असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे या निधीतून मेहरुण तलावाच्या भोवतालील 4 कि.मी. च्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापौर, जिल्हाधिकारी यांनी आज तलावाची पाहणी केली. या कामांचे प्रस्ताव 9 रोजी होणार्‍या विशेष महासभेत ठेवले जाणार आहेत.

टॉवर चौकाची पाहणी
आज गुरुवारी सकाळी महापौर, जिल्हाधिकारी, जैन समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, वास्तुविशाद शिरिष बर्वे यांनी टॉवर चौकाची सुशोभीकरणाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील डिव्हाइडर एका रेषेत नसल्याने त्यांचे व पोलचे शिफ्टींग करणे, भुमीगत केबल टाकण्याचे आरखडे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानतंर अजिंठा चौक सुशोभीकरण, महात्मा गांधी उद्यानाच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी पिपल्स बँक चालवित असलेली मुलांची शाळा, जैन समुह चालवित असलेली अनुभुती शाळेस भेट दिली. भोईटे शाळेची पाहणी करुन पहिल्या मजल्यावरील खोल्या ताब्यात घेण्याच्या सूचना प्रभारी आयुक्तांनी दिल्यात.