जळगाव – शहरातील दीक्षितवाडी भागातील वादग्रस्त जागेवर बोअरिंग खोदण्यावरुन १४ रोजी वाद झाला. ही जागा मनपाचा खुला भूखंड असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असून सदर जागा आपण २५ वर्षांपूर्वीच रेडीरेकनर दरानुसार विकत घेतली असल्याचा दावा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी केला आहे.
दीक्षितवाडीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार जळगाव सिटी सर्वे नं. २६५६\२२ टीपी २ मधील भूखंड क्रं. १६० हा भूखंड ९९ वर्षांच्या कराराने विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र महिला उद्यम ट्रस्ट, मुंबई यांना २१ ऑगस्ट १९८४ च्या आदेशान्वये सदरचा भूखंड दवाखाना, वसतिगृह आदी सार्वजनिक वापरासाठी विकसीत करण्यासाठी देण्यात आला होता. मात्र ३३ वर्ष झाले याठिकाणी आदेशात दर्शविल्याप्रमाणे जागा विकसीत करण्यात आलेली नसून ज्या प्रयोजनासाठी जागा देण्यात आली होती त्या अटीशर्थींचा भंग झाला असल्याचे म्हणत जागेचा खाजगी वापर करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा परिसरातील नागरिकांसाठी वापरण्यात येत असून या ठिकाणी बालके खेळतात. मनपाचा हा भूखंड असतांना येथे वाल कंपाऊंड बांधण्यात आले असून या जागेचा खाजगी वापर करत जागा बळकाविण्याचा प्रयत्न संबंधीतांकडून होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, दि. १४ रोजी याठिकाणी बोअरिंग करण्यात येणार असल्याने येथे पोलीस बंदोबस्तात बोअरिंग खोदण्याचे काम सुरु असतांना प्रशांत चौधरी, गोलू निंबाळकर, बापू पाटील, सचिन शुक्ला, रमेश शिंपी, सरला माळी, रागिणी चौधरी, स्वाती शिंपी, चंद्रकांत करंजे आदी नागरिकांनी विरोध दर्शवित काम बंद पाडले. दरम्यान काही वेळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला असला तरी पोलीस बराच वेळ या ठिकाणी थांबून होते.
तर या जागेबाबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांना विचारले असता सदर जागा २५ वर्षांपूर्वी रेडीरेकनरनुसार दर भरुन विकत घेतली आहे. त्यानुसार रितसर बोअरिंग खोदत असतांना नागरिकांनी वाद घातला. तसेच बोअरिंग खोदणाऱ्याच्या कार्यालयात जावून त्याला काहींनी धमकी दिली. दादागिरीचा हा प्रकार असल्याचा आरोप श्री. पाटील यांनी बोलतांना केला.