खासगी टूरिस्ट गाड्यांच्या अनधिकृत पार्किंगवर कारवाईचे आदेश

0

मुंबई । विलेपार्ले येथील टूरिस्ट गाड्यांचे अनधिकृत पार्किंग, ऑड-इव्हन पार्किंग, नो एंट्री इत्यादी प्रश्‍नांबाबत पाहणी करण्यासाठी वाहतूक विभागाचे सह-आयुक्त अमितेश कुमार यांनी आमदार पराग अळवणी यांच्यासोबत विलेपार्ले येथील विविध परिसरास भेट दिली. या भेटीदरम्यान नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या समस्यांची गंभीर दखल घेत त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी आदेश दिले. वाहतूक विभागाने आणि आमदार पराग अळवणी यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रस्त्यांवर होऊ लागल्यात प्रातःविधी
मुंबई विमानतळ येथील वाहनतळ खूप जास्त शुल्क आकारत असल्यामुळे टुरिस्ट गाड्यांचे चालक तेथे पार्किंग न करता विलेपार्ल्यात वाहने ठिकठिकाणी पार्क करतात. यामुळे गाड्या धुणे, चालकांचे जेवणापासून सर्व विधी रस्त्यावर होऊ लागले आहेत. रस्त्यावर खाणावळी बसू लागल्या आहेत. तसेच गाड्यांचे चालक 10 ते 15 जणांच्या घोळक्यामध्ये नाक्या-नाक्यावर उभे असतात. या सर्वामुळे वाहतूक कोंडीसोबत इतरही सामाजिक प्रश्‍न निर्माण होऊ लागले होते. विलेपार्लेत शिरताच नेहरू रोड, दयालदास रोड, गुजराती सोसायटी रस्ता तसेच डहाणूकर व साठ्ये महाविद्यालय परिसर त्याचप्रमाणे रामभाऊ बर्वे मार्ग, पार्ले टिळक शाळा परिसर व महात्मा गांधी रोड, अशी पाहणी करून त्यातही नागरिकांसोबत चर्चा केली.

अवजड वाहनांना बंदी
पाहणीनंतर वाहतूक पोलीस चौकीमध्ये बसून परिसराबाबत सविस्तर चर्चा करून त्याबाबत आवश्यक ते वाहतूक विभागाच्या सह.आयुक्तांनी आदेश दिले. त्यानुसार, टुरिस्ट गाड्यांना पार्किंग करू न देणे, त्यांच्या टुरिस्ट एजंट्सवरही कारवाई करावी, सिग्नलच्या कालावधीत बदल करणे तसेच वन-वेमध्ये बदल करणे, मार्केट परिसरात पीक अवर्समध्ये अवजड वाहनांना बंदी आणणे, असे निर्णय घेण्यात आले. आ. पराग अळवणी यांनी लोकाच्या समस्या जाणून केलेल्या कार्यवाहीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर वाहतूक विभागाने सकारात्मक प्रतिसादाबद्दल अळवणी यांनी समाधानी असल्याचे सांगितले.