खासगी ठेकेदाराकडून घेतल्या 185 बस ताब्यात

0

पुणे । पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणार्‍या ठेकेदारांचे बसचालक थकीत वेतनासाठी अचानक संपावर गेल्यामुळे पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी प्रसन्न पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे. त्यानंतर त्यांच्याकडून 200 पैकी 185 बस ताब्यात घेतल्या असून त्यापैकी 135 बस रस्त्यावर आहेत, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’मधील सूत्रांनी दिली. उर्वरित बसेसदेखील लवकरात लवकर रस्त्यांवर येतील, असेदेखील सांगण्यात आले आहे.

प्रसन्न पर्पल मोबिलिटी कंपनीकडून कोथरूड डेपोमध्ये 101 तर पिंपरी-चिंचवड येथे 99 बस कंत्राटी पद्धतीने चालविल्या जात होत्या. करारानुसार बस आणि वाहक ‘पीएमपीएमएल’चे होते तर चालक आणि मेंटेनन्स ठेकेदार कंपनीचे होते. हा ठराव 10 वर्षांसाठी झाला होता. मात्र तो करार रद्द झाल्याने पीएमपी प्रशासने या बस ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये पिंपरीमधील 99 बसपैकी 95 तर कोथरूडमधील 101 पैकी 91 अशा एकूण 185 बस ताब्यात घेतल्या. राहिलेल्या बस दुरुस्त करून घेणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या 185 बसपैकी 135 बस प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर आहेत.