खासगी प्रवासी गाड्यांची वाहतुक मंदावली, मावळात आंदोलनाचा परिणाम नाही

0

मुंबईतील आंदोलनामुळे द्रुतगतीसह महामार्ग पडला ओस
आळंदीतही निषेध आंदोलन

देहूरोड- मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला मागील दोन दिवसांपासुन हिंसक वळण लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-मुंबई महामार्ग आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग अक्षरशः ओस पडले होते. या मार्गावरील वाहतुक बंद झाल्यामुळे उर्से टोलनाक्यावरही शुकशुकाट दिसून येत होता. मावळात मात्र, या बंदचा परिणाम जाणवला नसुन सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. सकल मराठ समाजाच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई आणि परिसरात हिंसक वळण लागल्याच्या बातम्या दिवसभर धडकत होत्या. दुरचित्रवाणीवर याबाबतचे वृत्त सातत्याने दाखविले जात होते. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्ग आणि यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रतगती मार्गावरील वाहतूक अतिशय विरळ झाली होती. प्रतिदिन सरासरी 43 हजार वाहनांची क्षमता असणार्‍या या द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यावरही शुकशुकाट दिसुन आला.

महामार्गावर वाहतूक विरळ
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 मुंबई-पुणे महामार्गावरही वाहतूक विरळ झाली होती. छोट्या मोटारी तसेच स्थानिक वाहने, दुध टँकर आदी वाहनेच रस्त्यावर धावताना दिसत होती. देहूरोड-लोणावळा दरम्यान, महामार्ग तसेच द्रुतगती मार्गावर अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीसांच्यावतीने खबरदारी घेण्यात आली होती. गहुंजे, सोमाटणे या ठिकाणी द्रुतगती मार्गाला जोडणार्‍या रस्त्यांवर पोलीसांनी अडथळे उभारले होते. किवळे पुलाजवळ पोलीसांचे पथक तैनात करण्यात आले होते. तसेच आयआरबीच्या गस्तीपथकाकडून गस्त वाढविण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान, देहूरोड, किवळे, रावेत, देहुगाव या देहुरोड पोलीस हद्दीतील गावांतील प्रमुख गावकारभार्‍यांची पोलीसांकडून बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. पोलीसांकडून निगडी नाका, किवळे पूल, मुकाई चौक, देहुगाव मुख्य चौक, तळवडे या महत्वाच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त नेमला आहे. तसेच पोलीस हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली. बुधवारी या परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.