26 नोव्हेंबरला आता पुढील सुनावणी
पुणे : प्रवाशांची वाहतूक करणार्या खासगी बसेसला शहरात सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी ते 5 ते रात्री 9 प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी तूर्त स्थगिती दिली आहे. वाहतूक पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 26 नोव्हेंबरला होणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रवाशांची वाहतूक करणार्या खासगी बसेसला गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी 26 ऑक्टोबरला जाहीर केला आहे. तत्पूर्वी सकाळी सहा ते रात्री दहाच्या दरम्यान खासगी बसना शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, त्याविरोधात प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच, वाहतूकदारांनीही पालकमंत्री गिरीश बापट यांना साकडे घातले होते. त्यानंतर पोलिसांनी गर्दीच्या वेळेत बंदी घालण्याचा सुधारित आदेश जारी केला.
या निर्णयाच्या विरोधात कोंडूसकर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात कोंडी सोडविण्यासाठी केवळ खासगी बसच्या वाहतुकीवर निर्बंध का? एसटी महामंडळाच्या बसवर निर्बंध नाहीत, मात्र खासगी बसवर निर्बंध हा अन्याय आहे, असे चैतन्य निकते, प्रसन्न पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.