मुंबई : शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषीमालाला चांगला दर मिळावा यासाठी सर्व खासगी बाजार समित्यांनी ई-राष्ट्रीय कृषी बाजाराशी (ई-नाम) जोडणी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. हिंगोली व वाशीम जिल्ह्यातील खासगी बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक देेशमुख यांनी आज मंत्रालयात घेतली. या बैठकीस आमदार राजेंद्र पटणी,आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी आणि खासगी बाजार समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ई-नामच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी बाजाराशी ऑनलाईनरित्या जोडणी करणे पणन विभागांतर्गतच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खासगी बाजार समित्यांना बंधनकारक आहे. खासगी बाजार समित्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, बाजार समित्यांनी संघटितरित्या आपल्या समस्या मांडल्यास त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल.