खासगी महाविद्यालयावर पेण नगरपालिका मेहरबान

0

पेण । पेण नगरपालिका आर्थिक विवंचनेत असताना सत्ताधारी एका खासगी महाविद्यालयावर मेहेरबान झाले आहेत. या महाविद्यालयाच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी एक लाखाच्या बक्षिसांची खैरात करणार असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयाची मॅरेथॉन स्पर्धा रविवारी 17 डिसेंबरला पेण शहरात आयोजित करण्यात आली आहे. पिल्लई महाविद्यालयाच्या प्रसिद्धीकरिता व पुढील वर्षाच्या प्रवेशाची जाहिरात हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे महाविद्यालय रायगड जिल्ह्यातील पेण, उरण, पनवेल व कर्जत या शहरात दरवर्षी स्वखर्चाने ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत असते. मात्र, यावेळेस पेण नागरपलिकेतील सत्ताधारी या आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या महाविद्यालयावर मेहेरबान झाले असून या मॅरेथॉन स्पर्धेतील दहा गटांतील विजेत्यांना एक लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. सत्ताधार्‍यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत पेण मधील नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सहा महिने झाले तरी नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. नगरपालिका शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी फक्त दहा हजार रुपयांची तरतूद केली जाते. तीदेखील वेळेवर दिली जात नाही. स्वतःच्या नावासाठी सत्ताधारी नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करत आहेत.
– निवृत्ती पाटील,
विरोधी पक्षनेते,

एकीकडे निधीअभावी पेण शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले नसताना एका खासगी महाविद्यालयासाठी एक लाख रुपयांची उधळपट्टी करण्याची गरज काय?
– हरीश बेकावडे,
सामाजिक कार्यकर्ते